बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट गेल्याच आठवड्यात ११ ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित झाला. आमिरच्या इतर चित्रपटांप्रमाणे हा चित्रपटही ब्लॉकबस्टर ठरेल, अशी अपेक्षा होती. परंतु, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला म्हणावं तितकं यश मिळवता आलेलं नाही. प्रेक्षकांनी ‘लाल सिंग चड्ढाकडे’ पाठ फिरवल्याचं चित्र असून या चित्रपटाचे अनेक शोदेखील रद्द करण्यात आले आहेत.

‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाच्या निमित्ताने आमिर तब्बल चार वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्याच्या चाहत्यांप्रमाणेच आमिरलाही या बिग बजेट चित्रपटाकडून अपेक्षा होत्या. परंतु, सहा दिवसांत चित्रपटाला ५० कोटींची कमाईही करता आलेली नाही. चित्रपट फ्लॉप ठरल्यामुळे त्याची संपूर्ण जबाबदारी घेण्याचा निर्णय आमिरने घेतला होता. शिवाय चित्रपट वितरकांची नुकसान भरपाई करण्याचा निर्णयही आमिरने घेतला असल्याचं वृत्त होतं. यावर ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाची वितरक कंपनी वायकॉम १८ कडून खुलासा करण्यात आला आहे.

हेही वाचा : ‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशामुळे आमिर खान निराश, अभिनेत्याने घेतला मोठा निर्णय

वायकॉम १८ कंपनीचे सीईओ अजित अंधारे यांनी ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले, “’लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाचे वितरण वायकॉम १८ या एकमेव कंपनीने केलं आहे. भारताबरोबरच परदेशातील चित्रपटगृहांमध्येही अजून चित्रपट चालत आहे. त्यामुळे आम्हाला कोणतंही नुकसान झालेलं नाही. वितरक आमिरकडे नुकसान भरपाई मागत आहेत, या अफवा आहेत. कारण चित्रपटाचे निर्मातेच वितरकही आहेत”. अजित अंधारेंनी दिलेल्या या स्पष्टीकरणानंतर आमिर खान वितरकांना पैसे देणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

हेही वाचा : विकी कौशलने कतरिनासह सप्तपदी घेण्यासाठी केली होती घाई, लग्नाबाबत केला रंजक खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपट हॉलिवूडमधील ‘फॉरेस्ट गंप’ या चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाचे लेखन अतुल कुलकर्णी यांनी केलं आहे. चित्रपटात आमिर खानसह बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान मुख्य भूमिकेत आहे. मोना सिंह आणि दाक्षिणात्य सुपरस्टार नागाचैतन्यनेही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.