Chunky Panday talks about his First Film : अभिनेता गोविंदा आणि चंकी पांडे हे बऱ्याच काळापासून मित्र आहेत. त्यांनी चित्रपटांमध्येही एकत्र काम केले आहे. अलीकडेच ते ट्विंकल खन्ना आणि काजोलच्या ‘टू मच’ या टॉक शोमध्ये दिसले. शोमध्ये चंकी यांनी त्यांचा पहिला चित्रपट कसा मिळाला हे सांगितले.

चंकी पांडे म्हणाले की त्यांना भूमिकांसाठी संघर्ष करावा लागला, कारण त्यांना जास्त ऑफर मिळत नव्हत्या. चंकी म्हणाले, “मला अभिनेता व्हायचे होते, पण माझ्या कुटुंबात कोणीही कलाकार नव्हते. हो, माझे काका छोटी-मोठी भूमिका करत होते. माझा पहिला चित्रपट मिळविण्यासाठी मला चार ते पाच वर्षे संघर्ष करावा लागला. पण, जर मी चित्रपटसृष्टीत येऊ शकलो तर ते फक्त गोविंदामुळेच.” गोविंदा पुढे म्हणाला, “मी चित्रपट सोडला म्हणून त्याला तो मिळाला.”

चंकी पांडे काय म्हणाला?

चंकी पुढे म्हणाले, “मी बाथरूममध्ये पहलाज निहलानी यांना भेटलो. माझ्या कारकिर्दीला सुरुवात तिथेच झाली. पहलाजने गोविंदाबरोबर ‘इल्झाम’ हा चित्रपट केला होता, जो सुपरहिट झाला होता. पण, जेव्हा मी त्यांना बाथरूममध्ये भेटलो तेव्हा मी त्यांना ओळखत नव्हतो. तेव्हा सोशल मीडिया नव्हता. कोण कसे दिसते हे लोकांना माहीत नव्हते, म्हणून आम्ही दोघेही बाथरूममध्ये होतो. माझ्या पॅन्टचा बेल्ट उघडत नव्हता. मला कोणाची तरी मदत हवी होती. त्यांनी मला मदत केली, म्हणून मी त्यांना विचारले की ते काय करतात. त्यांनी सांगितले की ते एक निर्माते आहेत आणि त्यांचे नाव पहलाज निहलानी आहे. मला धक्का बसला, म्हणून मी स्वतःची ओळख चंकी पांडे अशी करून दिली. ते म्हणाले, ‘किती विचित्र नाव आहे.’ मी हो म्हणालो, पण मला चित्रपट करायचे आहेत, म्हणून त्यांनी मला दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी बोलावले. ते मला भेटले आणि मग मला भूमिका मिळाली.”

चंकी पांडे यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांनी १९८७ मध्ये आलेल्या ‘आग ही आग’ या चित्रपटातून सिनेविश्वात पहिलं पाऊल ठेवलं. त्यानंतर त्यांनी ‘गुनाहों का फैसला’, ‘खतरों के खिलाडी’, ‘मिट्टी और सोना’, ‘तेजाब’ ‘अपना सपना मनी मनी’, ‘हाउसफूल ३’, ‘हमशकल्स’, ‘सरदार’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे.