कलाविश्वामधील वातावरण वरवर कितीही आनंदी आणि उत्साही दिसत असले, तरीही तिथेही काही वाद असतात ही बाब मात्र नाकारता येत नाही. चेहऱ्यावर कितीही आपुलकीचे भाव असले तरीही कलाकारांची एकमेकांप्रती असणारी मतं बऱ्याचदा अनेकांना धक्काच देतात. मुख्य म्हणजे अशा गोष्टींचा उलगडा होतो, तेव्हा बऱ्याच चर्चांना वाव मिळतो. सध्याच्या घडीला अशाच चर्चांना वाचा फोडली आहे, ती म्हणजे अभिनेता ऋषी कपूर यांच्या एका वक्तव्यामुळे. एका मुलाखतीमध्ये त्यांनी हे वक्तव्य केल्याचं वृत्त ‘नवभारत टाइम्स’ने प्रसिद्ध केलं आहे. चित्रपटसृष्टीत काही कलाकार असेही आहेत, ज्यांना अभिनय कलाच अवगत नाही, या मतावर ते ठाम आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या काही वर्षांमध्ये चित्रपटसृष्टीत झालेल्या बदलांविषयी प्रश्न विचारला असता कपूर म्हणाले, ‘मला नेहमीच असं वाटत आलं आहे की, पटकथा ही चित्रपटाची आत्मा असते. त्यामुळे मी चांगलं कथानक असणाऱ्या चित्रपटांमध्येच काम केलं.’ त्या काळात ऋषी कपूर यांचे काही चित्रपट खऱ्या अर्थाने चौकटीबाहेरचे ठरले होते. मुळात त्याच चित्रपटांमधून अभिनयाच्या बळावर त्यांनी प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं होतं. ऋषी कपूर यांच्या कारकिर्दीत ‘दामिनी’, ‘प्रेम रोग’ हे चित्रपट खऱ्या अर्थाने काळाच्या पुढे जाणारे होते.

वाचा : इन्स्टाग्राम पोस्टमधून प्रिया वारियरची जबरदस्त कमाई

आपल्याच चित्रपटांविषयी बोलताना ज्यावेळी त्यांना अभिनयाशी निगडीत प्रश्न विचारण्यात आला, त्या प्रश्नाचं उत्तर देत ऋषी म्हणाले, ‘सध्याच्या घडीला चित्रपटसृष्टीत असेही काही कलाकार आहेत, ज्यांना अभिनय कला अवगतही नाही.’ त्यांच्या या वक्तव्यामुळे नेमकं त्यांना म्हणायचंय तरी काय, हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करुन गेला. चित्रपटांमध्ये भूमिका मिळवण्यासाठी एका अभिनेता किंवा अभिनेत्रीला चांगला अभिनय येणं अपेक्षित असतं. त्याकरता कोणाकडे याचना करणं आपल्याला अजिबात पटत नसून हे पूर्णपणे चुकीचं असल्याचं मतही त्यांनी मांडलं. सध्याच्या घडीला आशयघन चित्रपटांना मिळणारी प्रेक्षकांची पसंती पाहता ही अत्यंत बाब प्रशंसनीय असल्याचंही त्यांनी मुलाखतीदरम्यान स्पष्ट केलं.

वाचा : टीकाकारांकडे मी लक्षच देत नाही- राधिका आपटे

ऋषी कपूर सध्या ‘१०२ नॉट आऊट’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज होत आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून ते बऱ्याच वर्षांनी बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहेत. त्यामुळे या दोन्ही दिग्गजांना पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. सध्या चित्रपटसृष्टीत या चित्रपटाच्याही चर्चा रंगल्या असल्याचं पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor rishi kapoor again give controversial statement about actors
First published on: 15-03-2018 at 16:03 IST