सलमान खान सध्या रोमानियन सुंदरी लूलिया वंतूर हिला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून यांच्या नात्याची चर्चा बॉलिवूड वर्तुळात रंगत आहे. इतकंच काय, तर चाहत्यांमध्ये भाईजानच्या या अफेअरच्या चर्चा आहेत. पण, सलमानने किंवा लूलियाने विविध कार्यक्रमांमध्ये त्यांच्या रिलेशनशिपविषयी स्पष्टपणे वक्तव्य करण्यास नकारच दिला. इतकंच काय, तर आम्ही फक्त चांगले मित्र आहोत असंच या दोघांचं मत आहे. लूलिया सलमानच्या प्रत्येक कौटुंबिक कार्यक्रमाला आवर्जुन हजेरी लावते. त्याच्या कुटुंबीयांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी विविध ठिकाणी जाते. पण, लूलियाला या साऱ्यांमध्ये सलमानची खूप चांगली मैत्रीण आणि त्याची पूर्वाश्रमीची प्रेयसी संगीता बिजलानी मात्र खटकते.

सध्या सुरु असणाऱ्या चर्चा पाहिल्या तर याचा अंदाज लावणं सहज शक्य होत आहे. लूलिया व संगीता एकाच जिममध्ये जातात. काही दिवसांपूर्वी जिममध्ये त्यांच्यात कडाक्याचं भांडणही झालं होतं. ज्यानंतर संगीताने लूलियापासून चार हात लांब राहणं पसंत केलं. पण, त्यासोबतच सलमानच्या कुटुंबापासूनही ती दूर जाऊ लागली. या भांडणानंतर संगीता सलमानच्या कुटुंबाच्या कुठल्याही सदस्यासोबत दिसली नाही. शुक्रवारी रात्री सलमानची बहीण अर्पिता खानच्या घरी दिवाळी पार्टी होती. या पार्टीतही संगीता नव्हती. इतकंच नव्हे तर संगीताने सोशल मीडियावरुनही खान कुटुंबातील सदस्यांना अनफॉलो केल्याचं म्हटलं जात आहे.

वाचा : २७ मे १९९४ ला होणार होतं सलमानचं लग्न, पण..

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१६ मध्ये फिटनेस एक्सपर्टच्या बर्थडे पार्टीमध्ये सलमान आणि संगीताला एकत्र पाहण्यात आलं होतं. त्यानंतर ती आणि सलमान समोरासमोर आलेच नाहीत. संगीताने खान कुटुंबातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांकडेही पाठ फिरवली. अर्पिताच्या दिवाळी पार्टीमध्येही संगीताची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. सध्याची ही सर्व परिस्थिती पाहता लूलियामुळे सलमान आणि संगीताच्या मैत्रीच्या नात्यात फूट पडल्याचं म्हटलं जात आहे.