आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र असणारी अभिनेत्री आलिया भट्ट सध्या थोडी विश्रांती घेऊ शकते. कारण, ‘ब्रह्मास्त्र या आगामी चित्रपटाच्या सेटवर तिचा अपघात झाला आहे. एका अॅक्शन सीनचं चित्रीकरण करत असताना तिचा अपघात झाला.

सूत्रांचा हवाला देत ‘डीएनए’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार अॅक्शन सीनच्या चित्रीकरणादरम्यान, आलिया अचानकच पडली आणि तिला हलकीशी दुखापत झाली. ज्यामध्ये तिच्या उजव्या खांद्याला आणि दंडाला मार लागला. ही दुखापत पाहता तिला काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे आता येते काही दिवस आलिया चित्रपटातील अॅक्शन सीन्सपासून दूरच राहणार आहे. येत्या पंधरा दिवसांसाठी तिच्या हातावर बँडेड असून, हाताची हालचाल करण्यातही तिला बरीच अडचण येत असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’  हा चित्रपट १५ ऑगस्ट २०१९ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘ब्रह्मास्त्र’च्या निमित्ताने रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्क्रीन शेअर करणार आहेत. सध्या चित्रीकरणाच्या निमित्ताने बल्गेरिया येथे या चित्रपटाची टीम या महिनाअखेरपर्यंत चित्रीकरण पूर्ण करुन भारतात परतण्याची चिन्हं होती. पण, आता मात्र ही परिस्थिती बदलू शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

वाचा : ‘व्हायरल’ची गंभीर साथ!

पाहा : Video: अखेरच्या चेंडूवर षटकार खेचत कार्तिक ठरला हिरो, तो क्षण पुन्हा एकदा अनुभवायचा आहे??

सध्याच्या घडीला आलिया कोणत्याच अॅक्शन सीनच्या चित्रीकरणात योगदान देऊ शकत नाहीये. त्यामुळे ती फक्त ठराविक दृश्यांच्या चित्रीकरणातच सहभागी होऊ शकत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे अगदी शेवटच्या टप्प्यावर आल्यानंतर ‘ब्रह्मास्त्र’च्या वाटेत हा अडथळा आल्याचं म्हटलं जात आहे. चित्रपटाशी संलग्न कोणत्याच व्यक्तीने आलियाच्या या दुखापतीबद्दल माहिती दिली नसल्यामुळे आता अधिकृत माहितीकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.