अभिनेत्री रत्ना पाठक या त्यांच्या विनोदी भूमिकेसाठी ओळखल्या जातात. त्यांनी अभिनयाची सुरवात जरी सिनेमातून केली तरी त्यांची ओळख ही टीव्हीवर साकारलेल्या त्यांच्या दमदार भूमिकांमुळे झाली. त्या त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात. रत्ना या बॉलिवूड, त्यामध्ये होणारे राजकारण आणि त्यांच्या करिअर विषयी नेहमीच बोलत असतात. रत्ना यांना आपण ‘मंदी’, ‘मिरची मसाला’, ‘भारत एक खोज’, ‘साराभाई वर्सेस साराभाई’ सारख्या बऱ्याच चित्रपटात आणि मालिकेत पाहिले आहे. ‘साराभाई वर्सेस साराभाई’मधील त्यांनी साकारलेली माया साराभाईची भूमिका अजुनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. रत्ना पाठक या आज एक यशस्वी अभिनेत्री आहेत मात्र त्यांना बॉलिवूड चित्रपटातील बऱ्याच अश्या भूमिका साकारायच्या होत्या ज्या अभिनेत्री शबाना आझमी आणि स्मिता पाटील यांनी साकारल्या,असा खुलासा त्यांनी एका मुलाखतीत केला आहे.

रत्ना पाठक यांनी करिअरची सुरवात ८०च्या दशकात केली. या बद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, “८०च्या सुरवातीला मला महिलांसाठी लिहिलेल्या भूमिका साकारायला नक्की आवडलें असते. मात्र सगळ्या भूमिका अभिनेत्री शबाना आजमी आणि स्मिता पाटील यांच्याकडे जायच्या त्यामुळे मला संधी मिळाली नाही. नंतर मला ‘इधर-उधर’ नावाची मालिका मिळाली ज्यामुळे माझा आयुष्याकडे, कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आणि मी खुप नशिबवान आहे की माझा जो काही करिअर प्लान म्हणतात तो खुप छान घडला.”

यापुढे रत्ना यांनी त्यांच्या कामा बद्दल बोलताना सांगितले की, “अनेक वर्ष मला काहीच चांगलं काम मिळत नव्हते, कारण त्यांना वाटायचे की मी त्या भूमिकेसाठी योग्य नाही. आणि हे नंतर माझ्यासाठी खूप फायद्याचे ठरले कारण यामुळेच मी छोट्या पडद्याकडे वळले. मला इधर-उधर ही पहिली मालिका मिळाली. ही मालिका १९८४-८५ मधे प्रदर्शित झाली होती. मला असे वाटले होते की या मालिकेत काही ड्रामा असेल मात्र ही एक विनोदी मालिका होती. मी या भूमिकेसाठी काहीच तयारी केली नव्हती मात्र मी खूप उत्सुक होते कारण मला काहीतरी नवीन शिकायला मिळत आहे. या मालिकेमुळे माझी विनोदी भूमिकेशी ओळख झाली.”

रत्ना पाठक या ‘कपूर अँड सन्स ‘, ‘लिप्स्टिक अन्डर माय बुरखा’ सारख्या बऱ्याचा चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकल्या आहेत. तसेच त्या ‘साराभाई वर्सेस साराभाई’ या लोकप्रिय मालिकेच्या दुसरा सिझनसाठी पण चांगल्याच चर्चेत होत्या.