हिंदी चित्रपसृष्टीत एखाद्या कलाकाराप्रती असणारं चाहत्यांचं प्रेम पाहता आंतरराष्ट्रीय मनोरंजन विश्वातही अनेकांना याबद्दलच कुतूहल वाटतं. बॉलिवूडमध्ये बऱ्याच कलाकारांना चाहत्यांचं अमाप प्रेम मिळतं अशाच कलाकारांच्या यादीत अग्रस्थानी असणारा एक अभिनेता म्हणजे अमिताभ बच्चन. बिग बींभोवती नेहमीच चाहत्यांची गर्दी असते, इतकंच नव्हे तर, त्यांच्या घराबाहेरही या महानायकाची एक झलक पाहण्यासाठी चाहते घोळक्याने उभे असतात. कलाकार म्हणून आपल्याला मिळणाऱ्या या प्रेमाची परतफेड अमिताभ बच्चनही एका अनोख्या अंदाजात करतात.
दर रविवारी ते चाहत्यांची भेट घेण्यासाठी घराबाहेर येतात. अशाच एका ‘संडे दर्शन’च्या दिवशी त्यांची नात आराध्यासुद्धा बाहेर आली. त्यांच्यासोबतच ऐश्वर्या राय बच्चनही होती. चाहत्यांना हात दाखवून त्यांच्या प्रेमाचा स्वीकार करणाऱ्या बिग बींकडे ती टक लावून पाहात होती. त्या सुरेख क्षणाचा आनंद व्यक्त करत शहेनशहा अमिताभ यांनी ट्विटर अकाऊंटवरुन काही फोटो पोस्ट केले. पण, त्यांच्या फोटोंपेक्षा त्यासोबत त्यांनी लिहिलेलं कॅप्शनच जास्त चर्चेत आलं. ‘रविवारच्या या खास दिवशी चाहत्यांच्या शुभेच्छा मिळाल्या. आमच्या चिमुरडीची सर्वांशी नव्याने ओळख झाली. पण, ती थोडी घाबरली होती, असं तिने स्वत: सांगितलं’, असं कॅप्शन अमिताभ यांनी लिहिलं आहे. त्यासोबतच बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमधूनही आराध्याला त्यांच्या चाहत्यांसमोर कसा संकोचलेपणा वाटत होता याबद्दल लिहिलंय.
T 2439 – .. the Sunday well wishers .. and an introduction to the little one .. she confessed later : 'I was a little afraid'!! .. pic.twitter.com/85era6zQZL
— Amitabh Bachchan (@SrBachchan) May 29, 2017
‘…आणि आमची चिमुरडी सरतेशेवटी बाहेर येऊन चाहत्यांची भेट घेण्यासाठी तयार झाली. पण, इतकी गर्दी पाहून ती गोंधळली आणि तिने मान्य केलं की त्यावेळी तिला भीती वाटली होती.’ असं बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिलं आहे. आमिताभ बच्चन आणि त्यांची नात प्रतिक्षा बंगल्याजवळ चाहत्यांची भेट घेण्यासाठी येताच प्रसारमाध्यमं आणि चाहत्यांच्या कॅमेऱ्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. त्यावेळी आपल्या नातीसोबत चाहत्यांची भेट घेतल्याचा आनंद अमिताभ बच्चन यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला.
