2020 पासून बॉलिवूडने अनेक दिग्गज कलाकारांना गमावलं आहे. यामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. जेष्ठ संगीतकार राम लक्ष्मण यांचं नुकतंच निधन झालंय. ७९ व्या वर्षी त्यांनी नागपूरमध्ये अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून राम लक्ष्मण यांची प्रकृती खालावली होती. आज पहाटे त्यांची प्राण ज्योत मालवली. ज्येष्ठ संगीतकार राम लक्ष्मण यांच्या निधनामुळे बॉलिवूडसह अनेक क्षेत्रातील दिग्गज गहिवरले आहेत. ‘देशाच्या गानकोकिळा’ भारतरत्न लता मंगेशकर यांनी देखील त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय.

लता मंगेशकर यांनी ट्विटरवरून राम लक्ष्मण यांना श्रद्धांजली अर्पण केली. या ट्विटमध्ये त्यांनी ज्येष्ठ संगीतकार राम लक्ष्मण यांचा फोटो देखील जोडला आहे. हे ट्विट शेअर करताना त्यांनी लिहिलं, “मला काही वेळापूर्वीच कळलं की लोकप्रिय संगीतकार राम लक्ष्मणजी (विजय पाटील) हे स्वर्गवासी झाले आहेत…ही बातमी ऐकून मला खूप दुःख झालंय…ते एक उत्तम व्यक्ती होते…मी त्यांचे अनेक गाणे गायले आहेत जे नंतर खूप लोकप्रिय झाले…मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करते…”, असं लिहून भारतरत्न लता मंगेशकर यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

लता मंगेशकर यांना देखील ज्येष्ठ संगीतकार राम लक्ष्मण यांच्या जाण्याने धक्का बसला आहे. राम लक्ष्मण यांचं खरं नाव विजय काशीनाथ पाटील. वयाची विशी ओलांडल्यावर विजय पाटील नागपूरहून घर सोडून मुंबईला आले. आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी बॉलिवूडच्या मोहमयी दुनियेत प्रवेश तर मिळवलाच, पण स्वत:चा स्वतंत्र ठसाही उमटवला. विजय पाटील म्हणून नाही तर संगीतकार राम लक्ष्मण म्हणून. राम लक्ष्मण यांच्या नावावर एक दोन नाही तर तब्बल ९२ चित्रपट आहेत. मराठीतच नाही तर हिंदीतही त्यांनी एकाहून एक सरस, सुपरहिट गाणी दिली.