सनी देओल, श्रेयस तळपदे आणि बॉबी देओल यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ‘पोस्टर बॉईज’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बॉबी, सनी आणि श्रेयसच्या धमाल अभिनयाची झलक या चित्रपटाच्या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे. ‘पोस्टर बॉईज’ या चित्रपटाच्या निमित्ताने कलाकारांची विनोदी खेळी पाहायला मिळत आहे.
मनोरंजनाची एक नवी बाजू आणि त्याला एका सरकारी योजनेची जोड मिळाल्यावर तीन पुरुषांच्या आयुष्यात कशा प्रकारे गोंधळाचं वातावरण होतं याची झलक ‘पोस्टर बॉईज’ या चित्रपटातून पाहायला मिळत आहे. सनी देओलने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुनच हा ट्रेलर सर्वांच्या भेटीला आणला असून, त्याचा हॅशटॅगही ट्रेंडमध्ये आला आहे. सनी, श्रेयस आणि बॉबी यांच्या व्यतिरिक्त या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, उर्वशी रौतेला सुद्धा झळकणार आहेत.
Tareek pe tareek pe tareek, but #PosterBoys are finally here! #PosterBoysTrailer out now!
Watch the trailer here: https://t.co/JaCpJHCJgY— Sunny Deol (@iamsunnydeol) July 24, 2017
वाचा : गोष्ट पहिल्या सुपरस्टारच्या पहिल्या प्रेयसीची…
पुरुष नसबंदीच्या सरकारी पोस्टरवर तीन पुरुषांचे फोटो छापण्यात येतात. त्यांना कोणतीही कल्पना नसताना हे सर्व घडल्यामुळे त्यांच्या खासगी आयुष्यावर त्याचे कोणते परिणाम होतात आणि त्याचा लढा देण्यासाठी थेट प्रशासनालाच आवाहन देणारे हे तिघंजण कशा प्रकारे लढा देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. श्रेयस तळपदे दिग्दर्शित ‘पोस्टर बॉईज’ या चित्रपटाचा ट्रेलर पाहता मराठीतल्या ‘पोश्टर बॉईज’ या चित्रपटाच्या ट्रेलरची आठवण आल्यावाचून राहात नाही. तेव्हा आता हिंदीतले हे ‘पोस्टर बॉईज’ प्रेक्षकांची मनं जिंकणार का हे येत्या काळात कळेलच. ‘सोनी पिक्चर्स नेटवर्क्स प्रॉडक्शन’, ‘सनी साऊंड्स प्राइव्हेट लिमिटेड’ आणि ‘अफ्युलन्स मुव्हिज प्राइव्हेट लिमिटेड’ यांची निर्मिती असलेला हा चित्रपट ८ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.