बॉलिवूड चित्रपटांमध्ये बऱ्याच कलाकारांनी बालपणीच आपल्या कारकिर्दीची सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यातील काही कलाकार या कलाविश्वात आपलं स्थान मिळवण्यात यशस्वी झाले, तर काहीं चेहरे एक, दोन चित्रपटांनंतर फारसे दिसलेच नाहीत. अशाच चेहऱ्यांपैकी एक म्हणजे ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटात झळकलेली बालकलाकार हुजान खोदाइजी. हुजानपेक्षा ती ‘टिना’ याच नावाने जास्त ओळखली जाते.
१९८७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. या चित्रपटातील अनिल कपूर आणि श्रीदेवीच्या केमिस्ट्रीने सर्वांनाच भुरळ पाडली होती. त्याशिवाय ‘मोगॅम्बो’, ‘कॅलेण्डर’ आणि इतर पात्रांनीही प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या कलाकारांमध्ये सर्वाधिक लक्षवेधी ठरली ती म्हणजे एका चिमुकलीची भूमिका. ‘मिस्टर इंडिया’चं जिवापाड प्रेम असणारी ही चिमुकली होती, टिना म्हणजेच बालकलाकार हुजान खोदाइजी. बऱ्याच वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान हुजानच्या हाती स्क्रिप्ट देण्यात आली होती. इतकी मोठी स्क्रिप्ट पाहताच आपल्याला रडू आल्याचं खुद्द हुजाननेच एका मुलाखतीत स्पष्ट केलं. चित्रपटातील ज्या दृश्यांमध्ये ती रडताना दिसतेय त्या सर्व दृश्यांमध्ये तिने अभिनय केला नसून ती खरोखरच रडली होती.
दोन वर्षांपूर्वी ‘मामि फिल्म फेस्टिव्हल’मध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमादरम्यान ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटातील सर्व कलाकार एकत्र आले होते, त्यावेळी हुजाननेसुद्धा हजेरी लावली होती. ती सध्याच्या घडीला चित्रपटसृष्टीत सक्रिय नसली तरीही चित्रपटातील सहकलाकारांशी आजही तिची मैत्री कायम आहे. सध्याच्या घडीला हुजान एका अॅडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये अॅडव्हर्टायझिंग एक्झिक्युटिव्ह या पदावर काम करत असल्याची माहिती काही वेबसाइट्सने प्रसिद्ध केली आहे.
वाचा : … आणि त्या प्रसंगानंतर राखी-गुलजार यांच्यातील नात्याचं समीकरणच बदललं
हुजानने साकारलेल्या भूमिकेला इतकी लोकप्रियता मिळेलेली असतानाही चित्रपटसृष्टीत तिने करिअर का केलं नाही हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत होता. एका मुलाखतीत खुद्द हुजाननेच या प्रश्नाचं उत्तर देत म्हटलं की, ‘लोकांच्या नजरेत फारसं येणं पसंत नसल्यामुळे या चित्रपटाच्या चित्रीकरणानंतर मी बाहेरगावी निघून गेली. माझे वडील त्या चित्रपटाचे कास्टिंग दिग्दर्शक होते. मुख्य म्हणजे मी त्या चित्रपटाच्या ऑडिशन्सला गेले आणि तिथेच माझी निवडही झाली होती. या चित्रपटानंतर मी काही जाहिरातींमध्येही काम केलं. पण, मी लोकांच्या आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय ठरल्यामुळे माझ्यावर एक प्रकारचं दडपण आलं होतं.’ ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटातून आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी ‘टिना’ म्हणजेच हुजान आज या कलाविश्वापासून दूर एक सर्वसामान्य आयुष्य जगत आहे.