120 Bahadur Teaser : फरहान अख्तरची मुख्य भूमिका असलेला ‘१२० बहादूर’ या युद्धपटाचा दमदार टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात फरहान अख्तर १९६२ मधील ‘रेझांग ला’च्या युद्धात शौर्य गाजवलेल्या परमवीर चक्र विजेत्या मेजर शैतान सिंह यांची भूमिका साकारत आहे.
‘१२० बहादूर’ हा चित्रपट १९६२ च्या भारत-चीन युद्धातल्या ‘रेझांग ला’च्या ऐतिहासिक लढाईवर आधारित आहे. या युद्धात फक्त १२० भारतीय जवानांनी सुमारे ३,००० चिनी सैनिकांशी सामना करत शौर्याची अजरामर गाथा लिहिली होती.
‘१२० बहादूर’ चित्रपटाच्या या टीझरची सुरुवात एका हॉस्पिटलमधील सीनने होते, जिथे एक अधिकारी जखमी जवानाला विचारतो – “रेझांग ला मध्ये नेमकं काय घडलं?” पुढील दृश्यांमध्ये भारतीय सैनिकांवर सुरू असलेल्या हल्ल्यांचं आणि बर्फाच्छादित क्षेत्रातील लढाईचं चित्रण पाहायला मिळत आहे.
याशिवाय चित्रपटातील “ही वर्दी फक्त हिंमतच नव्हे, तर बलिदानही मागतं”, “मागे हटणं मला मान्य नाही” आणि “आपण देशासाठी आपलं प्राण देण्यास तयार असलो पाहिजे.” या संवादांमुळे अंगावर शहारे येत आहेत. तशा प्रतिक्रियासुद्धा अनेकांनी या टीझरखाली व्यक्त केल्या आहेत.
‘१२० बहादूर’ चित्रपट टीझर
२ मिनिट ८ सेकंदाच्या टीझरमध्ये सीमेवर सुरू असलेल्या या महायुद्धाचं भावनिक चित्रण पाहायला मिळत आहे. ‘तुफान’ (२०२१) नंतर फरहानचा हा चार वर्षांनंतरचा मोठा सिनेमा असून, त्याने साकारलेली मेजर शैतान सिंग यांची भूमिका खूपच प्रभावी असल्याचे या टीझरमधून पाहायला मिळत आहे.
चित्रपटात फर्हान अख्तर, विवान भटेना, अंकित सिवाच, एजाज खान, राशी खन्ना यांसह मराठी अभिनेते अजिंक्य देव यांचीसुद्धा छोटीशी झलक पाहायला मिळत आहे. ‘१२० बहादूर’ चित्रपटाविषयी अधिक सांगायचं झाल्यास, चित्रपटाचं दिग्दर्शन रजनीश घई यांनी केलं आहे. तर चित्रपटाचे निर्माते रितेश सिधवानी, फर्हान अख्तर (Excel Entertainment), अमित चंद्रा (Trigger Happy Studios) हे आहेत. येत्या २१ नोव्हेंबर २०२५ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.