Shah Rukh Khan on fans Question: शाहरुख खान हा बॉलीवूडचा किंग खान म्हणून ओळखला जातो. ३३ वर्षांच्या कारकि‍र्दीत अभिनेत्याने वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. तसेच शाहरुख खान हा सर्वात श्रीमंत अभिनेता ठरला आहे.

आता अभिनेता त्याच्या अभिनयामुळे किंवा त्याच्या संपत्तीमुळे चर्चेत नाही. सोशल मीडियावरील चाहत्यांशी त्याने साधलेला संवाद सध्या चर्चेचे कारण ठरत आहे. चाहत्यांच्या प्रश्नांना त्याने मजेशीर उत्तरे दिली आहेत. शाहरुख खानने नुकतीच ‘आस्क एसआरके’ या सेशनमध्ये चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. एकाने विचारले की मुलींना खूश ठेवण्यासाठी काय करावे? यावर अभिनेता म्हणाला की, माझ्या गाण्यांची मदत होऊ शकते.

“मन्नतमध्ये माझ्यासाठीदेखील…”

एका चाहत्याने शाहरुख खानला विचारले की, सर तुमच्या वाढदिवसासाठी आम्ही मुंबईत आलो आहोत, पण आम्हाल रूम मिळत नाहीये; मन्नतमध्ये रूम मिळेल का? यावर शाहरुख म्हणाला, “आजकाल मन्नतमध्ये माझ्यासाठीदेखील रूम नाही, भाड्याने रहात आहे.”

आणखी एका नेटकऱ्याने विचारले की, सर माझे तुमच्यावर प्रेम आहे, तुमचे माझ्यावर प्रेम आहे का? की हे एकतर्फी प्रेम आहे. यावर अभिनेता म्हणाला, “एकतर्फी प्रेमाबद्दल ऐकले आहेस? विनोद करत आहे, आय लव्ह यू टू.” एकाने विचारले की तुमच्या मुलाने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात आम्ही तुम्हाला पाहू शकतो का? यावर अभिनेता म्हणाला, “जर त्याला मी परवडत असेल आणि तो माझे नखरे सहन करू शकत असेल, तर मी त्याच्या चित्रपटात दिसू शकतो.”

किंग चित्रपटात सुहानाबरोबर काम करताना काय वाटते? यावर अभिनेता म्हणाला, “आपलेसे वाटते.” एकाने विचारले की मुलांबरोबर काम करताना काय भावना असतात? यावर अभिनेता म्हणाला, “सेटवर असताना मी इतर सहकलाकारांप्रमाणेच त्यांचा आदर करतो. त्यांच्या कामाचे, मेहनतीचे कौतक करतो. सेटवर नसताना इतकीच प्रार्थना करतो की त्यांच्या मेहनतीचे त्यांना फळ मिळू दे.”

एकाने विचारले की, सर तुम्ही तुमचे जुने चित्रपट पाहता का? यावर अभिनेता म्हणाला, “मी क्वचितच माझे जुने चित्रपट पाहतो. पण, जेव्हा मी कधीतरी माझे चित्रपट पाहतो तेव्हा मला लाजल्यासारखे वाटते आणि संकोचितदेखील वाटते.”

दरम्यान, शाहरुख खान लवकरच किंग या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर अभिनेता अभिषेक बच्चन आणि सुहाना खान दिसणार आहेत.