Aamir Khan’s reaction on Pahalgam Terror Attack : अभिनेता आमिर खानने पहलगाम हल्ल्याबाबत त्याची प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्याने यावेळी त्याच्या ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाचा आणि पहलगाम हल्ल्याबाबत उशिरा प्रतिक्रिया देण्याचा काही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्याने इस्लाम व दहशतवादी हल्ला याबद्दल त्याचं स्पष्ट मत मांडलं आहे.
आमिर खानने ‘इंडिया टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सोशल मीडियावर फार सक्रिय नसल्याने त्याला पहलगाम हल्ल्यावर प्रतिक्रिया देण्यास उशीर झाल्याचं सांगितलं आहे. आमिर म्हणाला, “अशा काही घटना घडल्या की लोक सोशल मीडियावर त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करतात. पण, मी सोशल मीडियावर तितका सक्रिय नाही.” पुढे आमिरने दहशतवादी हल्ल्याबाबत संताप व्यक्त केला आहे. तो म्हणाला, “त्यांनी धर्म विचारला आणि गोळ्या झाडल्या याचा काय अर्थ होतो? तिथे आपणही असलो असतो.”
‘सितारे जमीन पर’ आणि पहलगाम हल्ल्यावरील त्याच्या प्रतिक्रियेबद्दल बोलताना आमिर पुढे म्हणाला, “हा केवळ एक योगायोग आहे. मी जर आपल्या सैन्याने त्यांना दिलेल्या योग्य प्रतिसादाबद्दल बोललो तर मी काही चुकीचं करत आहे का? मी आपल्या सैन्याचा विचार करावा की माझ्या चित्रपटाचा? आणि जर मी फक्त माझ्या चित्रपटासाठी यावर मौन बाळगले असेल तर ते चुकीचं आहे, त्यामुळे मी मोकळेपणाने यावर माझं मत मांडलं.” पुढे त्याने पहलगाम हल्ल्यामुळे ‘सितारे जमीन पर’चा ट्रेलर लाँचचा कार्यक्रम पुढे ढकलल्याचं सांगितलं आहे.
आमिर खानने या मुलाखतीमध्ये इस्लामबद्दलचं त्याचं मत माडंलं आहे. आमिर म्हणाला, “कोणताही धर्म तुम्हाला लोकांना मारायला सांगत नाही. मी अशा दहशतवाद्यांना मुस्लीम मानत नाही, कारण इस्लाममध्ये असं लिहिलं आहे की, तुम्ही कोणत्याही निष्पाप जिवाला, महिला व मुलांना मारू शकत नाही. ते लोक असं कृत्य करून धर्माच्या विरोधात जात आहेत.” पुढे आमिरने त्याच्या देशप्रेमावर आधारित चित्रपटांबद्दल सांगितलं आहे. यावेळी त्याने ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांनी चित्रपटांमध्ये देशप्रेम दाखवल्याबद्दल कौतुक केल्याचं सांगितलं आहे. आमिर म्हणाला, “माझ्या चित्रपटांमध्ये माझं देशप्रेम दिसतं. ‘रंग दे बसंती’, ‘लगान’, ‘सरफरोश’, हे चित्रपट बघा मला नाही वाटत की असा कोणी कलाकार आहे, ज्याने मी जितके देशप्रेमावर आधारित चित्रपट केले आहेत तितके केले असतील.”