Aamir Khan Shared Experience Of Working With Salman Khan : काजोल व ट्विंकल खन्ना सध्या त्यांच्या ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ या शोमुळे चर्चेत आहेत. हा कार्यक्रम नुकताच सुरू झाला असून पहिल्याच भागात सलमान खान व आमिर खान यांनी हजेरी लावलेली. यावेळी आमिर खानने सलमान खानबरोबर असलेल्या त्याच्या मैत्रीबद्दल सांगितलं आहे.
काजोल व ट्विंकल यांच्या नवीन कार्यक्रमाच्या पहिल्या भागात सलमान व आमिर यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी एकमेकांबरोबर काम करण्याचा अनुभव सांगताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी आमिरने सलमान सेटवर लोकांना त्याचा असिस्टंट असल्यासारखं वागवायचा असंही म्हटलं आहे.
कशी झालेली आमिर व सलमानची मैत्री?
काजोलने कार्यक्रमात त्यांना विचारलं की तुमची मैत्री कशी झाली? यावर आमिरने सांगितलं की, जेव्हा त्याचा त्याच्या पहिल्या पत्नीबरोबर घटस्फोट होत होता, त्यादरम्यान त्यांची मैत्री झाली. सलमान त्याच्या घरी डिनरसाठी गेलेला आणि तिथेच त्यांची मैत्री झाली. आमिरने सांगितलं की सलमान कधीच वेळेवर येत नाही असं त्याला वाटायचं आणि त्यावेळी त्याला सलमान अजिबात आवडायचा नाही.
आमिर पुढे म्हणाला, “पूर्वी मला वाटायचं की हा नेहमी सेटवर उशिरा येतो. आम्ही ‘अंदाज अपना अपना’मध्ये एकत्र काम केलेलं, पण तेव्हा मी खूप जजमेंटल होतो; लोकांबरोबर खूप कठोर वागायचो. मी स्वत:बाबतही असाच होतो. मला वाटायचं की ही व्यक्ती बरोबर नाही, ते लोक नीट काम करत नाही. पण, हळूहळू मला कळलं की हे योग्य नाहीये आणि मी स्वत:मध्ये बदल केले आणि सलमानबरोबरही मैत्री झाली. आपण सगळे माणसं आहोत आणि सगळ्यांकडून चुका होतात.
सलमान खानलाही आमिरची एक सवय आवडायची नाही, त्याबद्दल त्याने सांगितलं आहे. सलमान म्हणाला, “जेव्हा आम्ही ‘अंदाज अपना अपना’साठी काम करत होतो तेव्हा आमिर सकाळी ७ वाजता यायचा आणि मी ९ पर्यंत पोहोचायचो, कारण त्याच्याकडे एकच चित्रपट होता आणि माझ्याकडे त्यावेळी १५ चित्रपट होते; त्यामुळे मी दिवसाला ३ शिफ्टमध्ये काम करायचो, म्हणून मी सेटवर जाईपर्यंत सगळे आलेले असायचे. आमिर खूप रिहर्सल करायचा. एका सीनसाठी १५-१५ वेळा रिहर्सल करायचा बाप रे बाप. त्यामुळे मी म्हणायचो, याचं झालं की मला बोलवा. तेव्हा याला वाटायचं की मला कामात रस नाहीये. जर कामाची आवड नसती तर मी तीन शिफ्टमध्ये काम केलं असतं का?”
‘अंदाज अपना अपना’नंतर या दोघांनी एकत्र काम केलं नाही. त्याबद्दल आमिर म्हणाला, “जेव्हा हा सेटवर यायचा तेव्हा आम्ही त्याला रिहर्सल करताना दिसायचो. त्यावेळी हा आम्हाला असं वागवायचा जसं आम्ही त्याचे असिस्टंट आहोत.” सलमान पुढे म्हणाला, चित्रपट बनल्यानंतर आमिर माझ्याविरोधात मुलाखती द्यायचा की मी सलमानबरोबर काम करणार नाही. तो सेटवर उशिरा यायचा, चांगली वागणूक द्यायचा नाही.” हे एकून आमिर म्हणाला, “त्यावेळी मला काही गोष्टी माहीत नव्हत्या, तेव्हा मला इतकी समज नव्हती.”