Aamir Khan on photo with Turkey President Erdogan : भारत-पाकिस्तान तणावादरम्यान अंकारा, बाकू यांनी इस्लामाबादला पाठिंबा दिल्यामुळे भारताचे तुर्कस्तान आणि अझरबैजानशी व्यापारी संबंध ताणले गेले. पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानंतर, देशभरातून तुर्कस्तानमधील वस्तूंच्या आयातीवर आणि पर्यटनावर बंदी घालण्याची मागणी होऊ लागली आहे.

याचदरम्यान, आमिर खानचे तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन व त्यांची पत्नी एमिने एर्दोगान यांच्याबरोबरचे फोटो सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झाले आहेत. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान तुर्कस्तानने पाकिस्तानला पाठिंबा दिला होता, त्यातच आमिरचे हे फोटो व्हायरल झाल्याने त्याला ट्रोल केलं जात आहे. आता आमिरने या वादग्रस्त फोटोंबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

आपण मदत केली आणि ते असं वागले- आमिर खान

“तुर्कस्तानने खूप चुकीचं केलं. या गोष्टीचा प्रत्येक भारतीयाला त्रास झाला,” असं आमिर इंडिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला. “काही वर्षांपूर्वी तुर्कस्तानमध्ये भूकंप झाला होता, त्यावेळी त्यांना सर्वात आधी मदत भारत सरकारने केली होती. त्यावेळी आमच्या सरकारलाही माहित नव्हतं आणि मी एर्दोगन यांना भेटायला गेलो, तेव्हा मलाही माहित नव्हतं की ते सात वर्षांनंतर आमच्याबरोबर असं वागतील. आम्ही मैत्रीचा हात पुढे केला आणि ते संकटात असताना वेळी त्यांना मदत केली आणि ते आपल्याशी असे वागले?” असं आमिर म्हणाला.

आमिरने सांगितलं की एर्दोगन यांच्याबरोबरचा त्याचा फोटो आताचा नाही, तर त्याच्या २०१७ मधील तुर्कस्तान भेटीचा आहे. “त्या वेळी आपले सरकारही तुर्कस्तानला सपोर्ट करत होते,” असं आमिरने नमूद केलं. आमिरचा एमिने एर्दोगन यांच्यबरोबरचा एक फोटो लाल सिंग चड्ढा चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा २०२० मधील आहे, अशी चर्चा होती. पण हा फोटो २०१७ पूर्वीचा आहे.

आमंत्रण दिलं तर नकार देऊ शकत नाही – आमिर खान

“एक सेलिब्रिटी व अभिनेता आहे, त्यामुळे मी जेव्हा दुसऱ्या देशात जातो तेव्हा त्या देशाचा राजदूत असतो. म्हणून जर कोणी मला चहासाठी आमंत्रण दिलं तर मी नकार देऊ शकत नाही, कारण ते चांगलं वाटत नाही,” असं आमिर म्हणाला. पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्तानवर भारतीयांनी बहिष्कार घातला, त्या निर्णयाचं आमिरने समर्थन केलं. “हा निर्णय बरोबर आहे. आपण तुर्कस्तानला अजिबात सपोर्ट करायला नको. आपण त्यांना मदत केली, पण तरी ते संघर्षादरम्यान पाकिस्तानला सपोर्ट करत आहेत, हे योग्य नाही,” असं आमिरने सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने ७ मे रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवले. त्यानंतर पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ले केले. भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान तुर्कस्तानने पाकिस्तानला पाठिंबा दिल्याने भारतीयांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. अनेक भारतीयांनी या दोन देशातील त्यांच्या ट्रिप कॅन्सल केल्या होत्या.