आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’ने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली होती. आमिर खानने ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट ओटीटीऐवजी यूट्यूबवर पे-पर-व्ह्यू पद्धतीने रिलीज केला. त्याच्या या निर्णयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. हा चित्रपट कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम करण्याऐवजी १०० रुपये प्रति व्ह्यू दराने युट्यूबवर रिलीज केल्यामुळे टीका झाली होती, त्याबद्दल आमिर खानने मौन सोडले आहे.
आमिर खानचा ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या ६ आठवड्यांतच युट्यूबवर प्रदर्शित झाला. “मला हा चित्रपट युट्यूबवर प्रदर्शित करण्याची नक्कीच भीती वाटत होती,” असं आमिरने गेम चेंजर्स पॉडकास्टवर सांगितलं. करोनाच्या साथीनंतर बिघडलेली प्रदर्शन व्यवस्था सुधारायचं आमिरने ठरवलं. कारण निर्मात्यांनी त्यांचे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करून आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी त्यांना चित्रपटांची विक्री करावी लागली.
कुणालाच दोष द्यायचा नाही – आमिर खान
आमिर पुढे म्हणाला, “मला कोणालाही दोष द्यायचा नाही, कारण त्यांचेही पैसे अडकले आहेत. प्रत्येकजण माझ्याइतकी वाट पाहू शकत नाही.” आमिरच्या मते ‘सितारे जमीन पर’ आणि किरण रावचा ‘लापता लेडीज’ सारखे चित्रपट माउथ पब्लिसिटीमुळे थिएटरमध्ये त्यांचे स्थान गमावतात. कारण प्रेक्षक चित्रपटाच्या थिएटर रिलीजच्या फक्त ८ आठवड्यांच्या आत ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहण्यास उत्सुक असतात.
‘३ इडियट्स’ या चित्रपटानंतर आमिरने त्याचे चित्रपट पे-पर-व्ह्यूवर प्रदर्शित करण्याचा विचार केला होता. या संदर्भात तो डिश टीव्ही आणि टाटा स्कायच्या प्रमुखांशी बोलला होता. “त्यांची पेमेंट सुविधा सोपी नव्हती. त्यांच्या सिस्टीमनुसार, तुम्हाला एका नंबरवर कॉल करावा लागायचा, नंतर अर्धा तास होल्डवर राहावे लागायचे, नंतर चित्रपट पाहण्यासाठी तुमचा फोन बॅलेन्स वाढवावा लागायचा. अशा रितीने कोणीच चित्रपट पाहू शकत नाही,” असं आमिर म्हणाला.
भारतात थिएटर्सची संख्या कमी
आमिरच्या मते, फक्त ३ ते साडेतीन कोटी लोक, म्हणजेच देशाच्या लोकसंख्येच्या केवळ २-३ टक्के लोक थिएटरमध्ये चित्रपट पाहतात. बाकीच्या लोकांचे काय? आपली लोकसंख्या १४० कोटी आहे, फक्त हिंदी भाषिक लोकसंख्येपुरता विचार केला, तरी आपण तितक्या लोकांपर्यंत पोहोसू शकत नाही. चीनमध्ये एक लाख आणि अमेरिकेत ३५ हजार थिएटर आहेत, तर भारतात फक्त ९ हजार थिएटर आहेत, त्यापैकी निम्मे दक्षिण भारतात आहेत, असं आमिरने नमूद केलं.
ओटीटीसाठी १२५ कोटींची ऑफर
युट्यूब व इंटरनेट व्यापक स्तरावर पोहोचलंय, त्याचबरोबर युपीआय वापरण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे पे-पर-व्ह्यू मॉडेल स्वीकारण्याची ही योग्य वेळ आहे, असं आमिरने नमूद केलं. ओटीटीसाठी १४५ कोटींची ऑफर मिळाली होती, त्यामुळे बजेट वसूल झाले असते आणि नफाही मिळाला असता, पण मग थिएटर आणि विदेशातील व्यवसाय उरले नसते.
आमिरने सह-निर्मात्यापासून विकत घेतला सिनेमा
आमिर म्हणाला की त्याला त्याच्या सह-निर्मात्याकडून ‘सितारे जमीन पर’ सिनेमा विकत घ्यावा लागला, कारण तो आमिरच्या पे-पर-व्ह्यू या निर्णयाशी सहमत नव्हता. “मला माझ्या निर्णयावर पूर्णपणे विश्वास होता. पण तरी मी जोखीम घेत असेल तर ती फक्त माझीच असावी, असं वाटत होतं,” असं आमिरने नमूद केलं. सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म एकत्रितपणेही भारतातील फक्त ३-४ कोटी लोकांपर्यंत पोहोचू शकतात, तर युट्यूब दररोज ५०-६० कोटी लोकांपर्यंत पोहोचतं, असं आमिरने सांगितलं.
“मी माझा चित्रपट कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मला विकणार नाही, असं मी कधीच म्हटलं नाही. पण मला या कालावधीबद्दल (थिएटर आणि स्ट्रीमिंग रिलीज दरम्यान ८ आठवड्यांचा कालावधी) समस्या आहे,” असं आमिर म्हणाला.