Aamir Khan says Pak cricketer Javed Miandad ruined his wedding: आमिर खान आणि रीना दत्ता एकेकाळी एकमेकांचे शेजारी होते. दोघे प्रेमात पडले, पण जेव्हा रीनाच्या आई-वडिलांना त्यांच्या नात्याबद्दल समजलं तेव्हा त्यांनी रीनाला आमिरला भेटायचं नाही, असं बजावलं. इतकंच नाही तर ती आमिरला भेटणार नाही, असं वचन तिच्याकडून घेतलं. आमिर व रीना यांना मात्र वेगळं व्हायचं नव्हतं, त्यामुळे त्यांनी कुटुंबियांच्या विरोधात जाऊन कोर्टात लग्न करण्याचा निर्णय घेतला.
आमिर खानने लग्न करण्यासाठी तो २१ वर्षांचा होईपर्यंत वाट पाहिली. कायदेशीररित्या लग्न करण्यासाठी मुलाचं वय २१ असावं लागतं. १४ मार्चला आमिर २१ वर्षांचा झाला आणि काही दिवसांनी त्याने रीनाशी लग्न केलं. आमिरने द लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानी क्रिकेटपटू जावेद मियांदादमुळे लग्न बरबाद झाल्याचं वक्तव्य केलं.
भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना
लग्न केल्यानंतर रीना व आमिरला घरी परत जायची भीती वाटत होती. “मला वाटलं सगळे विचारतील इतका वेळ कुठे होतात? पण आमचं नशीब चांगलं होतं. त्यादिवशी भारत- पाकिस्तान दरम्यान क्रिकेटचा सामना सुरू होता आणि दोघांच्याही घरातील लोक सामना पाहण्यात इतके व्यग्र होते की आम्ही घरात नाही, याची जाणीवही त्यांना झाली नाही,” असं आमिर म्हणाला.
जावेद मियांदादचा तो षटकार अन्…
आमिर खान पुढे म्हणाला, “तो भारत- पाकिस्तान समान होता. त्या सामन्यात शेवटच्या बॉलवर जावेद मियांदादने षटकार लगावला होता. आम्ही तो सामना जिंकणार होतो, त्यामुळे घरातील कोणीच मला काही विचारलं नाही. मीही सर्वांबरोबर बसून मॅच पाहत होतो. पण जावेदच्या त्या षटकाराने सगळं खराब केलं.”
जावेद मियांदाद-आमिर खानची भेट
आमिरची नंतर एकदा जावेद मियांदादशी भेट झाली होती, तेव्हाचा किस्सा त्याने सांगितला. “नंतर एकदा माझी जावेद मियांदादशी विमानात भेट झाली होती. मी त्यांना म्हणालो, ‘जावेद भाई, तुम्ही हे बरोबर नाही केलं. तुम्ही माझं लग्न बरबाद केलं.’ त्यांनी विचारलं – ‘कसं?’ मी म्हणालो, ‘त्या दिवशी तुम्ही षटकार लगावला आणि मी नैराश्यात गेलो होतो.”

रीना-आमिरच्या घरी लग्नाबद्दल समजल्यावर काय झालं?
दरम्यान, काही महिन्यांनी आमिर व रीना दोघांच्या कुटुंबाला त्यांच्या लग्नाचं गुपित समजलं. दोघांचेही कुटुंबीय प्रचंड नाराज झाले. रीनाच्या आई-वडिलांनी तर रागात तिच्याशी सगळे संबंध तोडले. रीनाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला. पण त्यानंतर ते एकत्र आले. रीनाचे वडील आजारी असतानाच तिच्या कुटुंबाने तिचं व आमिरचं लग्न मान्य केलं.
दोन्ही कुटुंबाने या दोघांचं लग्न स्वीकारलं. त्यानंतर आमिरची धाकटी बहीण फरहतचं लग्न रीनाचा भाऊ राजीव याच्याशी झालं. त्यानंतर आमिर व रीनाच्या वडिलांचे संबंध आणखी सुधारले. रीना व आमिर यांनी १६ वर्षे संसार केला. त्यांना जुनैद व आयरा ही दोन अपत्ये झाली. त्यानंतर २००२ साली त्यांचा घटस्फोट झाला.