Aamir Khan on Shahrukh khans Swades Movie: आमिर खानचा ‘सितारे जमीन पर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता आमिर खान चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे. अनेक मुलाखतींमध्ये तो हजेरी लावत आहे. यावेळी त्यांने केलेली वक्तव्ये ही चर्चेत असल्याचे दिसत आहे.

आता आमिर खान त्याच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्याने नुकतीच ‘झूम’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत आमिर खानने खुलासा केला की त्याने लगान या गाजलेल्या चित्रपटात आशुतोष गोवारीकरांबरोबर काम केल्यानंतर त्यांचा स्वदेस हा चित्रपट का नाकारला. तो म्हणाला की मला तो चित्रपट कंटाळवाणा वाटला होता.

आमिर खान काय म्हणाला?

आमिर खान म्हणाला की ‘लगान’च्या शुटिंगदरम्यान आशुतोष गोवारीकरांनी त्याला चित्रपटाची स्क्रीप्ट सांगितली होती. त्यावेळी त्या चित्रपटाचे नाव ‘कावेरी अम्मा’ असे होते. पण, लगानच्या शूटिंगनंतर जेव्हा त्याने स्वदेस चित्रपटाची पटकथा ऐकली, त्यावेळी त्याली ती कंटाळवाणी वाटली. हे त्याने आशुतोष गोवारीकरांना सांगितले होते.

अभिनेता असेही म्हणाला की मी तो चित्रपट आजही पाहिला नाही. तो सिनेमा चांगला बनलेला असावा. पण, मला इतकं माहित आहे की त्या चित्रपटातील शाहरुखचे काम लोकांना आवडले होते. आता आमिर खानच्या या वक्तव्यावर अनेक नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.

एका नेटकऱ्याने लिहिले, “मी स्वदेस चित्रपट टीव्हीवर ३-४ वेळा पाहिला आहे. दरवर्षी स्वातंत्र्य दिनी हा चित्रपट टेलिकास्ट होत असे. शाहरुख खानच्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक आहे. “, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “तू हा चित्रपट केला नाहीस, कारण- स्क्रीप्ट ओरिजनल होती?”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “हा ‘लाल सिंग चड्ढा’, ‘गजनी’ व ‘धूम’ सारखे रिमेक बनवतो आणि याला ऑस्करमध्ये चित्रपट घेऊन जायचे आहेत”, अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी लिहिल्या आहेत.

तर काही नेटकऱ्यांनी आमिर खानची बाजूदेखील घेतली आहे. त्यांनी म्हटले आहे की पूर्ण मुलाखत पाहा. आमिर खानने शाहरुख खानबद्दल कोणतेही वक्तव्य केले नाही. तो फक्त इतकेच म्हणाला आहे की त्याला ज्यावेळी आशुतोष गोवारीकरांनी त्याला स्क्रीप्ट ऐकवली होती. त्यावेळी त्याला ती कंटाळवाणी वाटली होती. तो शाहरुख खानविरुद्ध काहीच बोलला नाही.”

दरम्यान, आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाची प्रेक्षक अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत होते. या चित्रपटात अभिनेत्री जिनिलीया देशमुखदेखील प्रमुख भूमिकेत आहे. आता या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.