Abhinav Kashyap Talks About Anurag Kashyap : दिग्दर्शक अभिनव कश्यप काही दिवसांपासून चर्चेत आहे. यावेळी त्याने सलमान खानबद्दल अनेक दावे केले. अशातच आता त्याने त्याचा मोठा भाऊ अनुराग कश्यपबरोबरच्या नात्याबद्दलही प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनवने अलीकडेच सलमानबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेत्यावर काही आरोप केले होते. एवढंच काय तर त्यानं त्याच्या कुटुंबाबद्दलही काही देवे केलं होते. अशातच आता त्यानं त्याचा सख्खा मोठा भाऊ अनुरागबद्दलही सांगितलं आहे.

अनुराग कश्यपबद्दल अभिनव कश्यपची प्रतिक्रिया

‘बॉलीवूड ठिकाना’ला दिलेल्या मुलाखतीत त्यानं तो व अनुराग एकमेकांबरोबर बोलत नसल्याचं सांगितलं आहे. यावेळी भावाबरोबरच्या नात्याबद्दल तो म्हणाला, “माझ्या आणि अनुरागमधील हा वैयक्तिक विषय आहे. हा भावनिक मुद्दा आहे. अनेक लोकांना याबद्दल माहीत नाहीये की, आम्ही दोघेही एकत्र लहानाचे मोठे झालो. आम्ही एकाच शाळेत शिकलो. त्यानंतर दिल्लीत एकाच कॉलेजमध्येही होतो. आम्ही मुंबईत आलो. आम्ही एकाच इंडस्ट्रीत काम करीत आहोत. त्यामुळे आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आहोत.”

भावाबद्दल अभिनव पुढे म्हणाला, “आमचे पालक आम्हाला ओळखत नाहीत, त्याहून जास्त आम्ही एकमेकांना ओळखतो. आमच्यामध्ये नेहमी वाद होत असतात. तो माझ्यापेक्षा मोठा आहे आणि जेव्हा त्याला वाटायचं की, मी काही चूक केली आहे तेव्हा तो माझ्यावर हात उचलायचा. त्यानं मला अनेकदा मारलं आहे; पण तो माझ्यापेक्षा मोठा असल्यानं मी त्याच्यावर कधीच हात उचलणार नाही. आम्ही शेवटचं बोललो तेव्हा त्यानं एक चूक केलेली, ज्यामुळे मी त्याच्याशी बोलणं बंद केलं एवढंच.”

अभिनवनं पुढे त्याच्या व अनुरागच्या नात्याबद्दल अनेक अफवा पसरवल्या गेल्याचंही म्हटलं आहे. तो म्हणाला, “आमच्याबद्दल खूप गैरसमज आहेत किंवा काही गोष्टी वेगळ्या अर्थानं पुढे आल्या आहेत. मी एक मीमही पाहिलेली, जिथे मला मानसिक त्रास आहे, असं अनुराग बोललेला दिसतं. मला माहीत नाही की, तो असं काही बोलला आहे की नाही. पण, या गोष्टीमुळे मला काही फरक पडत नाही. तो माझा मोठा भाऊ आहे. तो माझा गुरूसुद्धा आहे. त्यानं मला अनेक गोष्टी शिकवल्या आहेत.”

अभिनव अनुरागबद्दल पुढे म्हणाला, “मी सगळी तयारी केली आहे. तुम्ही फक्त एकदा घरी जा. तुमच्या आईनं सगळ्या जुन्या चपला, जुनी भांडी एकत्र करून ठेवली आहेत तुमचं स्वागत करण्यासाठी. तुम्ही फक्त एकदा घरी जा.”