Abhishek Bachchan reveals directors refused to launch him: गेल्या अनेक वर्षांपासून नेपोटिझम या संकल्पनेचा अनेकदा वापर होताना दिसतो. बॉलीवूडमध्ये काम करत असलेले कलाकार त्यांच्या मुलांना, नातेवाईकांना प्राधान्य देतात आणि अभिनयाचा वारसा नसलेल्या कलाकारांना डावलले जाते, असे आजपर्यंत अनेकांनी वक्तव्य केले आहे.
बॉलीवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि लोकप्रिय अभिनेत्री जया बच्चन यांचा मुलगा असलेल्या अभिषेक बच्चनला अभिनय क्षेत्रात काम करणे, पहिला चित्रपट मिळवणे सोपे ठरले असेल असे अनेकांना वाटते. मात्र, सुरुवातीलाच अभिषेक बच्चनला अनेक नकार पचवावे लागले होते.
“२१ वर्षांचा असताना आपल्यामध्ये…”
अभिषेक बच्चनने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत, अनेक दिग्दर्शकांनी त्याला लाँच करण्यासाठी नकार दिलेला असा खुलासा केला. तसेच, त्याचे कारण काय होते हेदेखील सांगितले. नयनदीप रक्षितला दिलेल्या मुलाखतीत अभिनेता म्हणाला, “२१ वर्षांचा असताना आपल्यामध्ये खूप उत्साह असतो. आई-वडील मोठे कलाकार असल्याने अभिषेक अभिनेता होणार असे लोक म्हणत असायचे. त्या चर्चा कानावर पडायच्या. त्यामध्ये मीदेखील अडकत गेलो. काम मिळवण्यासाठी लोकांना भेटू लागलो, पण अनेकांनी मला काम देण्यास नकार दिला. कोणीही माझ्याशी उद्धटपणे वागले नाही.”
अभिषेक पुढे म्हणाला, “लोक मला काम का देत नाहीत, अमिताभ बच्चन यांच्या मुलाला लाँच करण्याची जबाबदारी आम्ही घेणार नाही, असे लोकांचे म्हणणे का होते हे मला त्यावेळी समजले नाही. पण, ज्यावेळी मी माझ्या पहिल्या चित्रपटात म्हणजेच ‘रिफ्यूजी’मध्ये काम करण्यास सुरुवात केली, तेव्हा मला त्या नकारापाठीमागचे कारण समजले. मला दिसले की, चित्रपटसृष्टीसाठी माझे वडील काय आहेत. त्यांच्या सहकारी, कलाकार, दिग्दर्शक, कनिष्ठ अभिनेते यांच्या मनात माझ्या वडिलांविषयी अमिताभ बच्चन यांच्याविषयी किती आदर आहे. त्यामुळे त्यांच्या मुलाला लॉन्च करण्याची जबाबदारी त्यांना नको होती.”
“मला काम न मिळण्याचे कारण मला समजले. पण, जेव्हा आपण लहान असतो, तरुण असतो, त्यावेळी तुमच्याकडे तितका समंजसपणा आलेला नसतो. तुम्हाला जगाचा कमी अनुभव असतो, त्यामुळे वाईट वाटते. ते खूप निराशाजनक असते. अनेक कलाकारांना हा अनुभव आलेला आहे. सध्या अभिषेक बच्चन त्याच्या कालीधर लापता या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे मोठे कौतुक होताना दिसत आहे.