Abhishek Bachchan Talks About Mother Jaya Bachchan : अभिषेक बच्चन अनेकदा त्याच्या आई व लोकप्रिय अभिनेत्री जया बच्चन यांच्याबद्दल कौतुक करताना दिसतो. अशातच आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने त्याच्या आईबद्दल सांगितलं आहे. जया यांना दिग्दर्शकानं चक्क अभिषेक बच्चनचं निधन झालं आहे, असं समज असं म्हटलेलं. त्याबद्दल अभिषेकने तेव्हा नेमकं काय घडलेलं याबद्दल स्वत: सांगितलं आहे.

अभिषेक बच्चनने ‘ई टाइम्स’शी संवाद साधताना त्याच्या आईबद्दल, कलाकारांच्या खासगी आयुष्याबद्दल, तसेच दिग्दर्शकानं जया यांना दिलेल्या सल्ल्याबद्दल सांगितलं आहे. १९९० मध्ये जया यांनी पाच वर्षांच्या ब्रेकनंतर पुन्हा इंडस्ट्रीत कमबॅक केलेलं. त्यावेळी त्या गोविंद निहलानी यांच्या चित्रपटासाठी काम करीत होत्या; पण एकदा सेटवरून घरी येताना त्या खूप बेचैन असल्याचं अभिषेकला जाणवलं.

अभिषेक बच्चनने सांगितला ‘तो’ प्रसंग

अभिषेक त्या प्रसंगाबद्दल म्हणाला, “मी तिला विचारलं की काय झालं? त्यावर तिनं सांगितलं की, मला एक सीन करायचा होता, जिथे मला माझ्या मुलाचा मृतदेह ओळखायचा असतो”. अभिषेक त्याबद्दल पुढे म्हणाला, “गोविंद निहलानी यांनी तिला तो मृतदेह तुझ्या मुलाचाच आहे म्हणजे माझा आहे, असं समज, असं म्हटलेलं. हे ऐकायलाच खूप कठीण जातं; पण कलाकार अशा अनेक गोष्टींमधून जात असतात. जरी दिग्दर्शकानं तिला तसं सांगितलं नसतं तरी शेवटी तो सीन खरा वाटावा यासाठी तिनं तोच विचार केला असता. कलाकाराचं सादरीकरण हे अनेकदा दिग्दर्शकावर अवलंबून असतं आणि कलाकार फक्त त्यांच्या हाताखालची बाहुली असतात.”

सीन चांगला व्हावा यासाठी दिग्दर्शकानं जया बच्चन यांना अभिषेक बच्चनच्या बाबतीत अशी घटना घडली आहे, असं समजण्याचा सल्ला दिल्याचं अभिषेक सांगत म्हणाला की, कलाकारांना अनेकदा त्यांच्या खासगी आयुष्यातील गोष्टी व्यावसायिक आयुष्यातही आणाव्या लागतात.

दरम्यान, अभिषेकबद्दल बोलायचं झालं तर, अभिनेता अलीकडे ‘झी ५’ वरील ‘कालीधर लापता’मधून झळकलेला. त्यामध्ये त्याच्यासह अभिनेत्री निम्रत कौरही झळकलेली. यापूर्वी तो ‘हाऊसपुल ५’मधून झळकलेला. अभिषेक सध्या सिद्धार्थ आनंद यांच्या ‘किंग’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. त्यामध्ये तो शाहरुख खानबरोबर पाहायला मिळणार आहे.