अमिताभ बच्चन या वटवृक्षाच्या सावलीत बऱ्याच छोट्या झाडांची वाढ खुंटली त्यापैकीच एक नाव म्हणजे बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन. अभिषेक जेव्हा चित्रपटसृष्टीत आला तेव्हा अमिताभ यांच्या नावाचा एवढा दबदबा होता की त्याच्या प्रत्येक कृतीची तुलना थेट अमिताभ यांच्याबरोबर व्हायची. अभिषेकने बरेच उत्तम चित्रपट केले पण आजही सोशल मीडियावर त्याला बऱ्याचदा ट्रोल केलं जातं. नुकतंच त्याची बहीण श्वेता बच्चननेसुद्धा याबद्दल खेद व्यक्त केला आहे.

अभिषेकची विनोदबुद्धी कमाल आहे आणि याचा आपण बऱ्याचदा अनुभव घेतला आहे. नुकतंच एका ट्विटर यूझरने अभिषेकची खिल्ली उडवली तर त्याला अभिषेकने दिलेलं उत्तर पाहून त्याच्या सेन्स ऑफ ह्युमरची दाद द्यायलाच हवी. एका ट्विटर यूझरने अभिषेकला काही कारणास्तव टॅग करत त्याची टेर खेचली आणि त्याला ‘बेरोजगार’ असं संबोधलं, इतकंच नव्हे तर या ट्वीटमध्ये त्याने याचा संबंध थेट बुद्धीमत्तेशी जोडला. एका ट्वीटला उत्तर देताना अभिषेकने प्रश्न विचारला की “लोक अजूनही वृत्तपत्र वाचतात का?” यावर एका यूझरने अभिषेकला टॅग करत उत्तर दिलं की “हुशार, बुद्धिमान लोक वाचतात, तुझ्यासारखे बेरोजगार नाही.”

आणखी वाचा : ओटीटीच्या नव्या नियमांचा नवाजुद्दीन सिद्दिकीला फटका; तब्बल ७ चित्रपटांच्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह

यावर अभिषेकने त्या यूझरला दिलेलं उत्तर सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. अभिषेक त्याच्या ट्वीटमध्ये म्हणाला, “तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. खरं सांगायचं झालं तर बुद्धिमत्ता आणि रोजगार याचा एकमेकांशी थेट संबंध नाही. तुमचंच उदाहरण द्यायचं झालं तर, मला खात्री आहे तुम्ही कमावते आहात, पण तुमच्या ट्वीटचा अंदाज घेता तुम्ही बुद्धिमान नक्की नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जूनियर बच्चनने दिलेलं हे उत्तर पाहून सोशल मीडियावर त्याचं कौतूक होत आहे. अभिषेकच्या चाहत्यांनी त्याच्या या खिलाडू वृत्तीचे आणि विनोदबुद्धीचे कौतूक केले आहे, तर काहींनी अभिषेकला अशा लोकांकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला आहे. अभिषेक नुकताच नेटफ्लिक्सच्या ‘दसवी’ या चित्रपटात झळकला. आता त्याच्या ‘ब्रीद : इनटू द शॅडोज’ या वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत.