scorecardresearch

तुमच्या आडनावाचा महाराष्ट्राशी संबंध आहे का? अनुपम खेर यांनी उत्तर देत सांगितला ‘खेर’चा इतिहास, म्हणाले, “गाढव…”

या मुलाखतीमध्ये अनुपम खेर यांनी बऱ्याच गोष्टींवर भाष्य केलं

तुमच्या आडनावाचा महाराष्ट्राशी संबंध आहे का? अनुपम खेर यांनी उत्तर देत सांगितला ‘खेर’चा इतिहास, म्हणाले, “गाढव…”
अनुपम खेर

‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट गेले काही दिवस पुन्हा चर्चेत आहे. गोव्यातील चित्रपट महोत्सवात ज्युरींनी या चित्रपटावर टीका केल्यानंतर हा मुद्दा चांगलाच चर्चेत आला. यावर बऱ्याच लोकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या तर काही लोकांनी ज्युरींच्या वक्तव्याला दुजोरा दिला. याबद्दल या चित्रपटात प्रमुख भूमिका निभावणारे अभिनेते अनुपम खेर यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आणि नदाव लॅपिड यांचं म्हणणं खोडून काढलं. नुकतंच अनुपम खेर यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीच्या ‘माझा कट्टा’वर हजेरी लावली.

या मुलाखतीमध्ये अनुपम खेर यांनी बऱ्याच गोष्टींवर भाष्य केलं तसेच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही खुलासा केला. इतकंच नाही तर अनुपम यांच्या आडनावामागे महाराष्ट्राचं कनेक्शन आहे का? या प्रश्नाचं उत्तर देताना अनुपम म्हणाले, “तसा आमच्या आडनावाचा महाराष्ट्राशी थेट संबंध नाही. आधी आमचं आडनाव खार होतं. पारसी लोकांची नावं त्यांच्या व्यवसायानुसार ठेवलेली असायची तसंच काश्मीरमध्ये बरामुल्ला ते श्रीनगर आम्ही गाढवांची ने आण करायचो, तेव्हा दळणवळणाची साधनं नसायची. त्यामुळे हाच आमचा व्यवसाय असल्याने आमचं नाव खारवाले पडलं. खारचा अर्थ म्हणजे गाढव. त्यानंतर आमच्या आजोबांनी ते नाव बदलून खारचं खेर केलं आणि मग पुढे आम्हीसुद्धा तेच नाव लावलं.”

आणखी वाचा : शाहरुख खानबरोबर काम करूनही अभिनेत्रीवर आली ‘ही’ वेळ; डेलनाज इराणीने व्यक्त केली खंत

याबरोबरच खेर हे आडनाव महराष्ट्रातील एक टिपिकल आडनाव आहे याची जाणीवही अनुपम खेर यांना झाली. अनुपम कामानिमित्त जेव्हा मुंबईत आले तेव्हा काही दिवस ते त्यांच्या एका मित्राकडे राहिले. नंतर त्यांनी स्वतःसाठी वेगळी जागा शोधली. याबद्दल बोलताना अनुपम म्हणाले, “एका धुणीभांडी करणाऱ्या महिलेच्या घरी तेव्हा मला जागा मिळाली. स्वयंपाकघरात आणि बाहेरच्या खोलीत खोलीत छोटासा पडदा लावून एका खोलीस ती महिला तिच्या मुलांबरोबर राहायची आणि बाहेरच्या खोलीत मी आणि २ ते ३ लोक मिळून राहायचो. दुसऱ्या दिवशी मी त्या महिलेच्या मोठ्या मुलाकडे इथला पत्ता विचारला, कारण मी कुठे राहतोय हे घरी सांगणं गरजेचं होतं. त्या मुलाने मला पत्ता लिहून देतो असं सांगितलं.”

त्या मुलाने पत्ता लिहून दिला तेव्हा तो वाचताना अनुपम खेर यांच्या चेहेऱ्यावर थोडं हसू आलं. याविषयी सांगताना अनुपम म्हणाले, “तो पत्ता फार मजेशीर होता. माझा पत्ता होता अनुपम खेर, २/१५, खेरवाडी, खेरनगर, खेररोड, बांद्रा (पूर्व). मी जेव्हा माझ्या वडिलांना हा पत्ता सांगितला तेव्हा त्यांनीदेखील मला मूर्खात काढलं. त्यानंतर मला समजलं की बी.जी.खेर हे तत्कालीन मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री होते. तेव्हा मला या नावामागची खरी गंमत आणि महाराष्ट्रात हे आडनाव बरंच कॉमन आहे याची जाणीव झाली.”

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 10:44 IST

संबंधित बातम्या