Dharmendra Health Update : शोलेतल्या ‘विरु’सह अनेक सशक्त भूमिका साकारणारे दिग्गज बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहेत. ते ८९ वर्षांचे आहेत. मागील १२ दिवसांपासून ते मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहेत. दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती आणखी बिघडल्याची माहिती समोर आली आहे.

धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आल्यावर सलमान खान, शाहरुख खान, अमीषा पटेल, गोविंदासह अनेक बॉलीवूड स्टार्स त्यांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात गेले होते. धर्मेंद्र यांना ३१ ऑक्टोबर रोजी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण सोमवारी, १० नोव्हेंबरला त्यांची प्रकृती खालावल्याच्या बातम्या येऊ लागल्या. नंतर हेमा मालिनी यांनी पोस्ट करून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती दिली.

धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातम्याही येत आहेत, पण या बातम्या खोट्या असल्याचं ईशा देओलने म्हटलंय. “माझ्या वडिलांची प्रकृती स्थिर आहे आणि ते बरे होत आहेत. आमच्या कुटुंबाला प्रायव्हसी द्या, अशी मी सर्वांना विनंती करते. माझे वडील बरे व्हावे, यासाठी प्रार्थना करणाऱ्यांचे आभार,” असं ईशा देओलने पोस्टमध्ये लिहिलं आहे.

ईशा देओलची पोस्ट

धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल चाहते काळजी व्यक्त करत आहेत. ईशाच्या पोस्टवर कमेंट करून धर्मेंद्र लवकर बरे व्हावे यासाठी ते प्रार्थना करत आहेत.

८ डिसेंबर १९३५ रोजी पंजाबमध्ये जन्मलेल्या धर्मेंद्र यांचे पूर्ण नाव धरम सिंह देओल आहे. त्यांचे वडील शाळेत मुख्याध्यापक होते. धर्मेंद्र यांनी एकदा सुरैयाचा ‘दिल्लगी’ हा चित्रपट एका चित्रपटगृहात पाहिला. त्यानंतर त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली. त्यांनी सलग ४० दिवस हा चित्रपट पाहिला होता. एकदा धर्मेंद्र यांना समजलं की फिल्मफेअर नव्या कलाकारांच्या शोधात आहे. त्यांनी अर्ज भरला आणि टॅलेंट हंटमध्ये निवड झाल्यावर ते मुंबईत आले.

धर्मेंद्र यांनी १९६० च्या ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. धर्मेंद्र यांनी अॅक्शन, कॉमेडी, लव्ह स्टोरी अशा प्रत्येक शैलीतील सिनेमे केले आणि प्रेक्षकांची मने जिंकली. १९७० च्या दशकात धर्मेंद्र ‘अ‍ॅक्शन हिरो’ म्हणून इतके लोकप्रिय झाले की लोक त्यांना ‘ही मॅन’ म्हणू लागले. १९७५ मध्ये आलेला ‘शोले’ हा चित्रपट धर्मेंद्र यांच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरला. या चित्रपटाने त्यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली, त्याचबरोबर सिनेमातील ‘बसंती’ म्हणजेच हेमा मालिनी यांची त्यांच्या खऱ्या आयुष्यात एंट्री झाली. ‘सीता और गीता’ मधील त्यांची दुहेरी भूमिका असो वा ‘चुपके चुपके’ हा त्यांचा विनोदी चित्रपट असो; त्यांनी प्रत्येक भूमिका उत्तमरित्या वठवली. आपल्या करिअरमध्ये ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या धर्मेंद्र यांनी प्रत्येक पात्राने लोकांची मनं जिंकली.

धर्मेंद्र यांना २०१२ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यांना फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. धर्मेंद्र वयाच्या ८९ व्या वर्षीही चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. धर्मेंद्र यांचे ‘इक्कीस’ व ‘मैने प्यार किया फिर से’ हे दोन चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेले नाहीत.