सलमान खान अद्याप अविवाहित असला तरी त्याच्या तरुणपणीचे अफेअर अन् त्याच्या लव्ह लाइफची अजूनही चर्चा होत असते. त्याचे इंडस्ट्रीतील मित्र किंवा सह-कलाकार त्याच्याबद्दल बरेच खुलासे करत असतात. सलमानबरोबर ‘टायगर जिंदा है’, ‘बागी: अ रिबेल फॉर लव्ह’सह काही चित्रपट करणारे अभिनेता प्रदीप रावत यांनी भाईजानच्या तुटलेल्या नात्यांबद्दल भाष्य केलं आहे.
प्रदीप एकेकाळी सलमानच्या जवळच्या काही मोजक्याच लोकांपैकी एक होते. त्यांनी सलमान खानचे सोमी अली आणि संगीता बिजलानी यांच्यासोबतचे ब्रेकअप जवळून पाहिले होते. एका मुलाखतीत त्यांनी सलमानवर ब्रेकअपचा काहीच परिणाम झाला नव्हता, असं सांगितलं. तर त्या दोन्ही अभिनेत्री मात्र खूप दुःखी झाल्या होत्या, असा खुलासा केला. तसेच ते सलमानपासून ठरवून दूर कसे गेले याबद्दलही प्रदीप यांनी सांगितलं.
सिद्धार्थ कन्ननशी बोलताना प्रदीप म्हणाले, “सलमान खानवर ब्रेकअपचा फारसा परिणाम झाला नाही. त्यांच्या ब्रेकअपचा सोमी अलीवर खूप परिणाम झाला होता. सलमान छान दिसतो, त्यामुळे त्याच्याकडे पर्यायांची कमतरता नाही. ते दोघेही माझे मित्र होते आणि आम्ही एकत्र बसायचो, एकत्र खायचो… ते दोघेही मला एकाच गोष्टीवरील आपापल्या बाजू सांगायचे.”
सलमानशी ब्रेकअपनंतर संगीता बिजलानीची प्रतिक्रिया काय होती असं विचारल्यावर प्रदीप रावत म्हणाले, “साहजिकच संगीतावर ब्रेकअपचा जास्त परिणाम झाला होता. कारण सलमानसारखा माणूस कोणाला गमावावासा वाटेल?” सलमान हार्टब्रेकर होता का? या प्रश्नाचं उत्तरही त्यांनी दिलं. “कधीकधी नकळत गोष्टी घडतात आणि काही गैरसमजही होतात. पण सलमान अतिशय स्वच्छ मनाचा माणूस आहे, तो कोणालाही दुखवू शकत नाही,” असं प्रदीप रावत म्हणाले.
तमन्ना भाटियाच्या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर जलवा, १७ दिवसांपासून करतोय तुफान कमाई; तुम्ही पाहिला का?
प्रदीप रावत सलमान खानचे जवळचे व विश्वासू मित्र होते, पण हळूहळू ते अभिनेत्यापासून दूर गेले. या निर्णयाचे स्पष्टीकरण देत ते म्हणाले, “मी अनेक वर्षे सलमानला भेटलो नाही, कारण मला वाटलं की जर मी त्याच्यासोबत जास्त काळ राहिलो तर त्याचा बॉडीगार्ड शेराची जागा मी घेईन. शिवाय सलमानचा मित्र म्हणून मी इतक्या आरामात राहिलो तर आयुष्यात मी काहीही साध्य करू शकणार नाही, असं मला वाटत होतं. त्यामुळे मी हळूहळू सलमानपासून दूर झालो.”
दरम्यान, ब्रेकअपनंतर संगीता बिजलानी आणि सलमान खान यांच्यात चांगली मैत्री आहे. पण सोमी अली व सलमानचं नातं खूपच कटू राहिलं. ब्रेकअप होऊन आज इतकी वर्षे उलटली असली तर सोमी बऱ्याचदा त्याच्यावर शोषणासह इतर गंभीर आरोप करत असते.