Satish Shah Last Post: ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचं शनिवारी, २५ ऑक्टोबर रोजी किडनी निकामी झाल्याने निधन झालं. ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’, ‘जाने भी दो यारों’, ‘मैं हूं ना’ व ‘हम साथ साथ हैं’ या मालिका व चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे सतीश शाह यांनी ७४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आपल्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या सतीश शाह यांच्या निधनाने फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.

बॉलीवूड सेलिब्रिटी आणि चाहते सतीश शाह यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत आहेत. सतीश शाह बऱ्याच काळापासून किडनीशी संबंधित आजाराशी झुंज देत होते. सतीश यांच्या निधनाची बातमी आल्यावर त्यांची शेवटची पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यांनी निधनाच्या एक दिवसाआधी म्हणजेच २४ ऑक्टोबर रोजी एक्सवर पोस्ट केली होती.

सतीश शाह यांनी शुक्रवारी त्यांच्या एक्स अकाउंटवरून केलेल्या पोस्टमध्ये दिवंगत अभिनेते शम्मी कपूर यांच्याबरोबरचा एक जुना फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये गोविंदाही त्यांच्याबरोबर दिसत आहे. फोटो शेअर करत सतीश शाह यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, “वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रिय शम्मी जी, तुम्ही नेहमीच माझ्या सभोवताली असता.” सतीश शाह यांनी ‘सँडविच’ चित्रपटात गोविंदा आणि शम्मी कपूर यांच्याबरोबर काम केलं होतं.

पाहा पोस्ट

सतीश शाह किडनीशी संबंधित समस्यांनी ग्रस्त होते. त्यांचे किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आले होते. शनिवारी सतीश शाह यांच्या निधनानंतर, पीडी हिंदुजा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरने एक निवेदन जारी केलं. त्यात म्हटलंय की सतीश शाह यांच्या प्रकृतीबाबत रुग्णालयात आपत्कालीन कॉल आला होता.

रुग्णालयातून मेडिकल टीमबरोबर एक रुग्णवाहिका तात्काळ त्यांच्या घरी पाठवण्यात आली. पण सतीश शाह काहीच प्रतिसाद देत नव्हते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेईपर्यंत रुग्णवाहिकेत सीपीआर देण्यात आला, पण मेडिकल टीमच्या अथक प्रयत्नांनंतरही, सतीश शाह यांना वाचवता आले नाही.

किडनी फेल्युअरची काही सामान्य लक्षणे –

  • थकवा आणि अशक्तपणा जाणवणे
  • शरीरातील विषारी पदार्थ योग्यरित्या बाहेर न पडल्यामुळे थकवा व अशक्तपणा जाणवतो.
  • लघवी कमी होणे किंवा जास्त होणे.
  • लघवीमध्ये रक्त येणे.
  • रात्री वारंवार लघवीला जावे लागणे.
  • पाय, घोटा किंवा डोळ्यांच्या भोवती सूज येणे.
  • शरीरात विषारी पदार्थ साचल्यामुळे मळमळ आणि उलट्या होणे.
  • भूक न लागणे.
  • रक्तदाब वाढणे.
  • शरीरातील बदलांमुळे चक्कर आणि डोकेदुखी.
  • पाठीच्या वरच्या किंवा मधल्या भागात वेदना होणे.