९० च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री म्हणून काजोलला ओळखलं जातं. काजोलनं तिच्या ३० वर्षांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. काजोल ही ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांची मोठी मुलगी आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार’ सोहळ्यात या मायलेकींनी उपस्थिती लावली होती. आपल्या लाडक्या लेकीला मानाचा पुरस्कार स्वीकारताना पाहण्यासाठी तनुजा या सोहळ्याला आल्या होत्या.

काजोलला तिच्या चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी ‘स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार २०२४’ प्रदान करण्यात आला आहे. तर, लोकप्रिय अभिनेते अनुपम खेर यांना ‘स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार २०२४’ ने सन्मानित करण्यात आलं आहे.

काजोलने हा मानाचा पुरस्कार स्वीकारल्यावर प्रतिक्रिया देताना सर्वांशी खास मराठी भाषेत संवाद साधला. यावेळी अभिनेत्रीने, “या खास क्षणी मी माझ्या आईची साडी नेसून आलीये” असंही सांगितलं. काजोल नेमकं काय म्हणालीये पाहुयात…

काजोलने व्यक्त केल्या भावना…

पुरस्कार स्वीकारल्यावर काजोल म्हणाली, “आज माझा वाढदिवस आहे आणि आजच्या खास दिवशी माझा सन्मान करण्यात आला ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. या मंचावर सगळे दिग्गज उपस्थित आहेत त्यांच्या हस्ते मला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला हे माझं भाग्य आहे. खरंतर मी नि:शब्द झाले आहे, मला काय बोलावं हे सुद्धा सुचत नाहीये, हा क्षण माझ्यासाठी खूप खास आहे. याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे माझी आई इथे माझ्याबरोबर आलीये. त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे मी तिची साडी नेसून आज या कार्यक्रमाला आलीये. ही माझ्या आईची साडी आहे. हा पुरस्कार यापूर्वी माझ्या आईला देखील मिळाला होता आणि आज तोच पुरस्कार मला मिळतोय यापेक्षा मोठा अवॉर्ड दुसरा काय असणार? मी सर्वांची खूप-खूप आभारी आहे. थँक्यू.”

दरम्यान, सध्या संपूर्ण मनोरंजन विश्वातून काजोलवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. या सोहळ्यात काजोल आणि अनुपम खेर यांच्यासह ज्येष्ठ मराठी अभिनेते महेश मांजरेकर व लोकप्रिय अभिनेत्री मुक्ता बर्वेचाही सन्मान करण्यात आला आहे.