Actress Malvika Raaj Announces Pregnancy : करण जोहरच्या ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटातील छोटी ‘पू’ लवकरच आई होणार आहे. ‘पू’ ही भूमिका करून लोकप्रिय झालेली अभिनेत्री मालविका राजने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट करून लवकरच घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन होणार असल्याची माहिती दिली.
३४ वर्षांची मालविका राज लग्नानंतर दीड वर्षांनी आई होणार आहे. तिने बिझनेसमन प्रणव बग्गाशी थाटामाटात गोव्यात लग्न केलं होतं. आता दोघांनी सुंदर फोटोशूट करून त्यांच्या आयुष्यात एक चिमुकला सदस्य येणार असल्याची गुड न्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. या फोटोंमध्ये मालविका व प्रणव खूपच आनंदी दिसत आहेत.
मालविकाने You + Me = 3 असं कॅप्शन देत हे फोटो पोस्ट केले आहेत. मालविकाच्या टोपीवर आई व प्रणवच्या टोपीवर बाबा लिहिलं आहे. मालविकाने फोटोशूटसाठी पांढरे शर्ट व शॉर्ट्स, तर प्रणवने पांढरं शर्ट व जीन्स असा पोशाख निवडला.
पाहा पोस्ट
मालविकाने हे सुंदर फोटो शेअर केल्यावर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. क्रिती खरबंदा, आयशा श्रॉफ, रिद्धिमा पंडित, अमायरा दस्तूर, वर्धन पुरी, क्रिष्णा श्रॉफ या सेलिब्रिटींसह चाहत्यांनी मालविका व प्रणवला या नवीन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
मालविका-प्रणवची लव्ह स्टोरी
एका मुलाखतीत मालविकाने तिची आणि प्रणवची लव्ह स्टोरी सांगितली होती. दोघेही कॉलेजच्या दिवसांपासून एकमेकांना ओळखत होते आणि खूप चांगले मित्र होते. त्यांची मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. दोघे एकमेकांपासून फक्त ५ मिनिटांच्या अंतरावर राहत होते.
मालविकाला सुरुवातीपासूनच असं वाटत होतं की ती आणि प्रणव एकमेकांसाठीच बनले आहेत. मालविका म्हणाली, जेव्हा तुमच्या आयुष्यात योग्य व्यक्ती येते तेव्हा तुमचं मन आपोआप म्हणतं की ‘हीच ती व्यक्ती आहे’. तिलाही असंच वाटत होतं. पुढे दोघांनी काही वर्षे डेट करून लग्न केलं. प्रणव खूप चांगला आहे, असं म्हणत तिने त्याचं कौतुक केलं होतं.
दरम्यान, मालविका मॉडेलिंगमध्ये खूप सक्रिय आहे. २०२१मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्क्वाड’ चित्रपटात ती शेवटची दिसली होती. ‘झी-५’वर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा फार चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. मालविकाचे कुटुंबीय सिनेइंडस्ट्रीत सक्रिय आहेत. मालविका ही अभिनेते जगदीश राज यांची नात, तर बॉबी राज यांची मुलगी आणि ज्येष्ठ अभिनेत्री अनीता राज यांची भाची आहे. कॉस्ट्यूम डिजाइनर सोनाक्षी राज ही तिची बहीण आहे. तर मालविकाची आई रीना राज बॉलीवूडमधील मोठ्या निर्मात्या आहेत.