Rekha : अभिनेत्री रेखा म्हटलं की समोर येतो तिचा सुंदर चेहरा आणि तिचा कमाल अभिनय. अमिताभ बच्चनसह तिची असलेली केमिस्ट्री. रेखा गणेशन हे नाव हिंदी चित्रपटसृष्टीतल्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलं आहे कारण रेखा यांची कारकीर्दच तशी आहे. रेखा आज ७१ वर्षांची झाली आहे. पण तिचं सौंदर्य आणि तिचा अभिनय याची साक्ष देणारे चित्रपट आजही आपल्याला लक्षात आहेत. रेखा पासून रेखाजी, ज्येष्ठ अभिनेत्री रेखा असं होण्याचा प्रवास सोपा नाही. त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याचा आणि फिल्मी करिअरचा विचार केला तर हे कळतंच.

भानुरेखा गणेशनची झाली रेखा

१० ऑक्टोबर १९५४ हा रेखा यांचा जन्मदिवस. जेमिनी गणेशन यांच्या त्या कन्या. रेखाचं मूळ नाव भानुरेखा गणेशन असं होतं. चित्रपटात आल्यानंतर ते रेखा इतकंच राहिलं. तिचं आडनाव तिने लावलं नाही आणि रेखाची जादू इतकी होती आणि आहे की ते काय? हे शोधायची कधी आवश्यकता कुणाला भासली नाही. जेमिनी गणेशन आणि पुष्पावली हे रेखा यांचे आई वडील दोघंही अभिनय क्षेत्रात होते. गवयाचं पोर जसं सूरात रडतं तसंच रेखाही अभिनेत्री होण्याची स्वप्नं पाहू लागली.

Rekha Birth Day News
अभिनेत्री रेखाने वयाच्या १४ व्या वर्षापासून चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. (फोटो-फेसबुक)

१९६६ मध्ये बाल कलाकार म्हणून केलं काम

रेखाने बाल कलाकार म्हणून १९६६ मध्ये तेलुगू चित्रपट रंगुला रतनम मधून काम केलं. त्यानंतर गोदाली सीआयडी ९९९ या कन्नड चित्रपटात ती अभिनेत्री म्हणून झळकली. तिच्या बरोबर तेव्हा सुपरस्टार डॉ. राजकुमार होते. मात्र हिंदीत तिने ‘दो शिकारी’ नावाचा चित्रपट केला होता. ज्यामुळे वाद झाला.

‘दो शिकारी’ आणि चुंबन दृश्याचा वाद

रेखा आणि विश्वजीत यांच्या भूमिका असलेला ‘दो शिकारी’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत राहिला. कारण यामध्ये विश्वजीत आणि रेखा यांचं चुंबन दृश्य होतं. सेन्सॉरने हे दृश्य स्वीकारलं नाही. मात्र रेखा यांना विश्वजीत यांनी चुंबनदृश्यादरम्यान साधारण १५ ते २० मिनिटं सोडलंच नव्हतं. याचं गॉसिप त्या काळी खूप गाजलं. ‘अनजाना’ नावाचा चित्रपटही रेखाने केला. मात्र ‘दो शिकारी’ची चर्चा जास्त झाली. चित्रपट प्रदर्शित होण्यावर सेन्सॉरने निर्बंध लादले गेले. पण दीर्घ काळाने दो शिकारी प्रदर्शित झाला. जो तिकीट खिडकीवर काहीही कमाल दाखवू शकला नाही.

सावन भादो मध्ये नवीन निश्चलसह काम

सावन भादो या १९७० मध्ये आलेल्या चित्रपटात रेखा यांचे नायक नवीन निश्चल होते. हा चित्रपट तुफान चालला आणि खऱ्या अर्थाने रेखा यांना हिंदी सिनेसृष्टीत ओळख मिळाली. तसंच १९७६ मध्ये अमिताभसह केलेला ‘दो अंजाने’ हा चित्रपट रेखाच्या कारकिर्दीतला माईलस्टोन ठरला. रेखा आणि अमिताभ या जोडीचा हा पहिला चित्रपट होता. यानंतर १९७८ मध्ये घर नावाचा चित्रपट आला ज्यात रेखा आणि विनोद मेहरा होते. घर चित्रपटातील रेखाच्या अभिनयाने सगळ्यांची मनं जिंकली. या चित्रपटासाठी रेखाला फिल्मफेअर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

Rekha Birth Day News
रेखा आणि अमिताभ यांची जोडी पडद्यावर सुपरहिट ठरली होती. (फोटो-फेसबुक)

‘खुबसूरत’ आणि रेखा

खुबसूरत हा ऋषिकेश मुखर्जींनी दिग्दर्शित केलेला हलकाफुलका चित्रपट होता. या चित्रपटात रेखा मध्यवर्ती भूमिकेत होती. या चित्रपटामुळे ती घराघरांत पोहचलीच. शिवाय तिची एक चुलबुली इमेजही तयार झाली. या चित्रपटासाठीही रेखाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारने गौरवण्यात आलं. यानंतर ‘उमराव जान’ हा चित्रपटही रेखाच्या कारकिर्दीतला महत्त्वाचा चित्रपट ठरला.

‘उमराव जान’ची चर्चा प्रचंड झाली

१९८१ मध्ये आलेल्या ‘उमराव जान’ या चित्रपटात रेखाने ‘तवायफ’ साकारली. मिर्जा हादी रुसवा यांची कादंबरी ‘उमराव जान’ यावर हा चित्रपट बेतलेला होता. या चित्रपटात रेखाने केलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या चित्रपटातली गाणी आशा भोसले यांनी गायली होती. ‘इन आँखो की मस्ती के’ हे गाणं तर आजही एखाद्या अत्तराच्या कुपीप्रमाणे अनेक रसिकांच्या मनात घर करुन आहे. एकीकडे रेखा अभिनयाच्या बाबतीत अधिकाधिक प्रगल्भ होत होती. दुसरीकडे व्यक्तिगत आयुष्यात ‘अमिताभ’ नावाचं वादळही होतं. जे सिलसिला या चित्रपटानंतर शमलं.

Rekha Birth Day News
रेखाने उमराव जान चित्रपटात साकारलेली मध्यवर्ती भूमिका प्रेक्षक अजूनही विसरेले नाहीत. (फोटो-लोकसत्ताऑनलाइन)

अमिताभ आणि रेखा यांच्या अफेअरच्या चर्चा

दो अंजाने, सुहाग, मिस्टर नटवरलाल, मुकद्दर का सिकंदर, खून पसीना, आलाप, नमकहराम अशा एकाहून एक सरस चित्रपटांमध्ये या दोघांची जोडी झळकली. लोकांना ही जोडी आवडूही लागली. याच दरम्यान दोघांच्या अफेअर्सच्या चर्चाही रंगल्या. १९८१ मध्ये आलेला सिलसिला हा या जोडीचा शेवटचा चित्रपट ठरला. यातलं रंग बरसे हे गाणं आणि त्यात जया बच्चन आणि संजीव कुमार यांच्या चेहऱ्यावरचे उडालेले रंग हे अजूनही लोक विसरलेले नाहीत. या चित्रपटानंतर दोघांनी एकत्र काम केलं नाही.

Rekha Birth Day News
रेखा आणि अमिताभ यांच्या नात्याच्या चर्चा त्यावेळी चांगल्याच रंगल्या होत्या. (फोटो-फेसबुक)

अमिताभ बच्चन यांना हरिवंशराय बच्चन यांनी समज दिल्यानंतर रेखापासून ते दूर झाले अशाही चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या. अमिताभ आणि रेखा यांच्या नात्यातले गहिरे रंगच चित्रपटात दाखवले गेले होते. चित्रपट तिकिट खिडकीवर खूप व्यवसाय करु शकला नाही. पण हा चित्रपट रेखा यांच्या उत्कृष्ट अभिनयाची साक्ष देणारा ठरला. खास करुन जया बच्चन आणि रेखा यांच्या अभिनयाच्या जुगलबंदीचा सीन आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. राकेश रोशन दिग्दर्शित खून भरी मांग या चित्रपटाला घवघवीत यश मिळालं.

माया ची भूमिकाही गाजली

९० च्या दशकात रेखाने चित्रपटात काम करणं कमी केलं. मात्र खिलाडिंयोका खिलाडी या चित्रपटात तिने लेडी गँगस्टर मायाची भूमिका साकारली. वयाने लहान असलेल्या अक्षय कुमारसह इंटिमेट सीनही दिले. ज्यामुळे रेखा पुन्हा चर्चेत आली. चार दशकांच्या तिच्या करिअरमध्ये रेखाने सुमारे १७५ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. २०१० मध्ये रेखाला पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.

Rekha Birth Day News
९० च्या दशकानंतर रेखाने भूमिका करणं कमी केलं, पण जी भूमिका केली ती जीव ओतून केली यात शंकाच नाही. (फोटो-लोकसत्ता ऑनलाइन)

रेखाच्या वैयक्तिक आयुष्यात प्रचंड संघर्ष

रेखाच्या वैयक्तिक आयुष्यात खूप संघर्षही होता. तिच्या लग्नांमुळे ती चर्चेत आली. रेखाने अभिनेते विनोद मेहरा यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र त्यानंतर काही अवधीत विनोद मेहरा यांचा मृत्यू झाला. रेखा आणि विनोद मेहरा यांचं लग्न विनोद मेहरांच्या आईला मान्य नव्हतं. Rekha The Untold Story या यासिर उस्मान लिखित पुस्तकात या प्रसंगाचा उल्लेख आहे. रेखा आणि विनोद मेहरा यांनी लग्न केलं. लग्नानंतर विनोद मेहरा कोलकाता या ठिकाणी रेखाला घेऊन गेले. रेखाला पाहून विनोद मेहरा यांची आई चांगलीच संतालली होती आणि तिने धक्के मारुन रेखाला घराबाहेर काढलं असा उल्लेख या पुस्तकात आहे. यानंतर १९९० मध्ये व्यावसायिक मुकेश अग्रवाल यांच्याशी रेखाने दुसरं लग्न केलं. मात्र लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यांत मुकेश अग्रवाल यांनी आत्महत्या केली. रेखाशी लग्न झालं की ती व्यक्ती जिवंत राहात नाही अशाही अफवा तेव्हा पसरल्या. रेखाबद्दलही अद्वातद्वा बोललं गेलं. तिला ‘नॅशनल व्हॅम्प’ असं नकारात्मक बिरुदही मिळालं. मात्र सगळ्या गोष्टींना मागे टाकत रेखा वाटचाल करत राहिली. रेखाची चित्रपटसृष्टीतली वाटचाल खूप मोठी आहे. तसंच वैयक्तिक आयुष्यात तिने अनेक अडचणी सहन केल्या. त्यामुळे तिच्या आयुष्याकडे आणि कारकिर्दीकडे पाहिलं की हे नक्की जाणवतं रेखा होणं सोपं नाही.