Sonam Bajwa Regret On Rejecting Bold Scenes : अलीकडे सिनेमा आणि सीरिजमध्ये बोल्ड सीन सर्रास असतात. ओटीटीवरील काही सीरिजमध्ये तर असे बोल्ड सीनच अधिक असतात. काही अभिनेत्री संहितेची किंवा कथानकाची गरज म्हणून असे बोल्ड सीन करतात. पण काही अभिनेत्री मात्र बोल्ड सीनसाठी स्पष्ट नकार देतात. ‘लोक काय म्हणतील’ या विचाराने अनेक अभिनेत्री असे बोल्ड सीन असलेले सिनेमे नाकारतात.
अभिनेत्री सोनम बाजवानेही अशा बोल्ड सीन्समुळे अनेक बॉलीवूड सिनेमे नाकारले होते आणि याचा तिला आता पश्चाताप होत आहे. अभिनेत्री सोनम बाजवा हिने अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला की, तिने पूर्वी बॉलीवूडचे अनेक चित्रपट फक्त बोल्ड आणि किसिंग सीन असल्यामुळे नाकारले होते. मात्र, आता ती म्हणते की, त्या संधी नाकारल्याचा तिला पश्चाताप होत आहे.
Film Companion ला दिलेल्या मुलाखतीत सोनम म्हणाली, “मी काही बॉलीवूड चित्रपटांच्या ऑफर्स नाकारल्या होत्या, कारण मला वाटायचं, पंजाबमधील लोकांना हे चालेल का? आपल्याकडे चित्रपट कुटुंबाबरोबर पाहिले जातात; त्यामुळे मला याची भीती वाटायची. मला सतत वाटायचं की, लोक काय म्हणतील? माझ्या कुटुंबीयांना काय वाटेल? लोक काय विचार करतील? हे फक्त अभिनयासाठी आहे; हे घरच्यांना समजेल का? अशा अनेक प्रश्नांनी मी गोंधळले होते.”
यापुढे सोनम म्हणाली, “काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी याबाबत आई-वडिलांशी बोलले आणि त्यांनी लगेच म्हटलं, ‘जर हे चित्रपटासाठी आहे, तर काही हरकत नाही’ आणि मला धक्काच बसला. तेव्हा मी याबद्दल त्यांच्याशी आधीच का बोलले नाही, असा विचार माझ्या डोक्यात आला. आपण एखाद्या गोष्टीबद्दल खूप गैरसमज करून घेतो. मला त्यांना विचारायला लाज वाटत होती, पण त्यांनी ते अगदीच सहजपणे स्वीकारलं आणि ‘चित्रपटच आहे ना? मग ठीक आहे’ असं म्हटलं.
दरम्यान, सोनमच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास, २०१३ मध्ये ‘बेस्ट ऑफ लक’ या पंजाबी चित्रपटातून तिने अभिनयात पदार्पण केलं. पंजाब १९८४’ या चित्रपटामुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. तिने काही तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्येही काम केलं आहे. २०१९ मध्ये तिने ‘बाला’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली.
सोनम बाजवा इन्स्टाग्राम पोस्ट
तसेच ‘स्ट्रीट डान्सर ३ डी’, ‘हाउसफुल ५’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्येही सोनम झळकली आहे. तिचा शेवटचा चित्रपट ‘बागी ४’ होता, ज्यात ती टायगर श्रॉफबरोबर झळकली होती. अशातच आता ती लवकरच ‘एक दीवाने की दीवानियत’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिचा हा सिनेमा येत्या २१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.