अनेक बॉलीवूड अभिनेत्रींनी प्रेमविवाह केले, पण त्यांचे संसार फार काळ टिकले नाही. काहींनी तर धर्मांच्या भिंती ओलांडून लग्न केले होते. अदिती गोवित्रीकर, पूजा बेदी या दोघींचेही घटस्फोट झाले. पूजा बेदीने अलिकडेच एक्स पती बेस्ट फ्रेंड असल्याचं विधान केलं. दुसरीकडे मराठमोळ्या अदिती गोवित्रीकरने एका मुलाखतीत बोलताना एक्स पतीला पुन्हा भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती.
मॉडेल-अभिनेत्री आदिती गोवित्रीकरने मुफ्फझल लकडावालाशी १९९८ साली लग्न केलं होतं. ११ वर्षांच्या संसारानंतर या दोघांचा २००९ मध्ये घटस्फोट झाला. अदितीच्या घटस्फोटाला आता १६ वर्षे झाली आहेत. अदिती व मुफ्फजल यांना एक मुलगी आणि एक मुलगा अशी दोन अपत्ये आहेत. घटस्फोटानंतर मुलांचा सांभाळ अदितीने एकटीने केला.
लग्न मोडलंय हे पचवणं खूप कठीण होतं – अदिती गोवित्रीकर
एका मुलाखतीत अदितीने तिच्या घटस्फोटाबद्दल प्रतिक्रिया दिली होती. हा आयुष्यातील सर्वात कठीण टप्पा होता, असं तिने म्हटलं होतं. “माझे अयशस्वी लग्न माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्प्यांपैकी एक आहे. मला जिंकायला आवडतं. लहानपणापासून मला जिंकायचं होतं, मला वर्गात पहिलं यायचं होतं, मला फियर फॅक्टर जिंकायचे होते, मला बिग बॉस जिंकायचे होते. त्यामुळे माझं लग्न मोडलंय हे पचवणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. माझ्याबरोबर असं का घडलं? हेच विचार मला यायचे,” असं अदिती म्हणाली होती.
कधीतरी आम्ही बोलू – अदिती गोवित्रीकर
“माझीही कुठेतरी चूक झाली असावी, याची जाणीव मला झाली, कारण टाळी एका हाताने वाजत नाही,” असं अदिती म्हणाली होती. “माझी इच्छा आहे की एखाद्या दिवशी मी त्याच्याबरोबर (पूर्वाश्रमीचा पती) बसून घटस्फोटाबद्दल बोलेन. कारण कधीकधी भांडणानंतर आपल्याला तो विषय कुठेतरी संपवणं गरजेचं असतं. आम्ही एकमेकांना न सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी आहेत, त्यामुळे कदाचित कधीतरी आम्ही बोलू. आम्ही बोलून काही विषय संपवले, तर ते फक्त आम्हा दोघांसाठीच नाही तर मुलांसाठीही चांगलं होईल. आता १३ वर्षे झाली आहेत, पण तुम्ही तुमचा भूतकाळ विसरू शकत नाही. आठवणी तुम्हाला भूतकाळात गुंतवून ठेवतात,” असं अदितीने काही वर्षांपूर्वी म्हटलं होतं.
अपराधीपणाची भावना मनात यायची – अदिती गोवित्रीकर
अदितीची दोन्ही मुलं त्यांच्या वडिलांच्या संपर्कात आहेत, पण तिने एकटीने मुलांचा सांभाळ केला. “त्यांना एकटं वाढवणं खूप कठीण होतं. माझं बालपण खूप आनंदी होतं. माझे आईवडील मिळून आमच्यासाठी निर्णय घ्यायचे, मुलांनी सहलीला जायचं की नाही या गोष्टीही ते मिळून ठरवत असतं. पण मला मात्र मुलांचे सर्व निर्णय एकटीला घ्यावे लागतात. मला आई आणि वडील दोन्ही भूमिका पार पाडाव्या लागतात. घटस्फोटानंतर कामासाठी मुलांना माझ्या आई किंवा बहिणीकडे सोडावं लागायचं, त्यावेळी अपराधीपणाची भावना मनात यायची,” असं अदिती गोवित्रीकर म्हणाली होती.
५१ वर्षांची अदिती गोवित्रीकर थुम्मडू, धुंड, दे दना दन, स्माइल प्लीज, डिसेप्टिव्ह दीवा या चित्रपटांसाठी ओळखली जाते. तिचे पती मुफ्फजल लकडावाला हे एक भारतीय सर्जन आहेत. ते मुंबईतील डॉ. मुफी या डायजेस्टिव्ह हेल्थ इन्स्टिट्यूटचे संस्थापक आहेत. अदितीपासून घटस्फोट घेतल्यावर दोन वर्षांनी त्यांनी प्रियंका कौलशी लग्न केलं.