Ajay Devgn Talks About His Coactor From Son Of Sardaar 2 : ‘सन ऑफ सरदार २’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजय देवगण व मृणाल ठाकूर यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट सध्या बराच चर्चेत आहे. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे. अशातच नुकतीच चित्रपटाच्या टीमने प्रमोशननिमित्त कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली आहे. यावेळी या चित्रपटातील एका लोकप्रिय अभिनेत्याने तो झोपण्यापूर्वी बायकोच्या पाया पडतो, असं वक्तव्य केलं आहे.

‘सन ऑफ सरदार २’ या चित्रपटात कलाकारांची मोठी फौज पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये अजय देवगण, मृणाल ठाकूर यांच्यासह संजय दत्त, चंकी पांडे, रवी किशन, अश्विनी कळसेकर, संजय मिश्रा यांसारखे कलाकार झळकणार आहेत. अशातच या चित्रपटातील कलाकारांनी प्रमोशनिमित्त कपिल शर्माच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती.

‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार यावेळी कपिल शर्मा रवी किशन यांना म्हणाला, “मी असं ऐकलंय की, तुम्ही झोपण्यापूर्वी तुमच्या बायकोच्या पाया पडता”. त्यानंतर प्रेक्षकांमध्ये हास्यकलोळ उडाला. परंतु, त्यावर रवी किशन काही बोलण्यापूर्वीच अजय देवगण गमतीत म्हणाला, “पुरुष जितका दोषी असतो, तितका जास्त तो त्याच्या बायकोच्या पाया पडतो”.

अजय देवगण नंतर नवज्योत सिंग सिद्धू यांचा उल्लेख करीत त्यांची गमत करताना म्हणाला, “सिद्धूपाजींनी तर एक रुमाल क्रिकेटवर, एक राजकारणात आणि या कार्यक्रमावर तर त्यांनी पूर्ण चादरच टाकली आहे”. त्यासह अजय देवगणने कपिल शर्माचीदेखील मस्करी केली. अजय कपिलबद्दल म्हणाला, “लोक वजन घटवतात; पण तू इतकं जास्त वजन घटवलं आहेस की आता तुझ्या नाकाचं वजनही कमी झालं आहे”. त्यावर कपिल म्हणाला, “आज अजयसर सर्वांची मस्करी करण्याच्या मूडमध्ये आहेत”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘सन ऑफ सरदार २’ या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, ‘सन ऑफ सरदार २’ हा अजय देवगणची मुख्य भूमिका असलेल्या ‘सन ऑफ सरदार’ या २०१२ साली आलेल्या चित्रपटाचा सीक्वेल आहे. त्यामध्ये त्याच्यासह अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा झळकली होती. परंतु, ‘सन ऑफ सरदार २’मध्ये सोनाक्षीच्या जागी अभिनेत्री मृणाल ठाकूर झळकणार आहे. येत्या २५ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.