अक्षय कुमारचा ‘मिशन रानीगंज’ हा चित्रपट तीन दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला, पण तो सध्या या चित्रपटामुळे नाही तर नव्या जाहिरातीमुळे चर्चेत आला आहे. मागच्या वर्षी जाहीर माफी मागणारा अक्षय पुन्हा एकदा पान मसाल्याच्या जाहिरातीत झळकला आहे. या जाहिरातीत अक्षयबरोबर अजय देवगण व शाहरुख खानदेखील दिसत आहेत. नेटकरी जाहिरातीचा व्हिडीओ शेअर करत अक्षयवर टीका करत आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान झालेल्या विश्वचषक सामन्यादरम्यान शाहरुख खान, अजय देवगण आणि अक्षय कुमार यांच्या पान मसाला ब्रँडची नवीन जाहिरात प्रसारित झाली. ही जाहिरात बघून चाहत्यांना धक्का बसला. कारण अक्षयने मागच्या वर्षी पान मसाला ब्रँडची जाहिरात केल्याबद्दल जाहीरपणे माफी मागितली होती. तसेच त्याने जाहिरातीतून काढता पाय घेतला होता. पण आता दीड वर्षांनी पुन्हा तो पान मसाला जाहिरातीत झळकला आहे.
“अक्षय कुमार म्हणाला होता की आता तो पान मसाल्याच्या जाहिराती करणार नाही कारण जेव्हा त्याने पहिल्यांदा विमलची जाहिरात केली होती, तेव्हा त्याचे चाहते खूप नाराज झाले होते. आता पुन्हा त्याने जाहिरात केली आहे,” असं नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर, ‘पैशांसाठी अक्षय कुमार काहीही करू शकतो’, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. ‘अक्षयचे चित्रपट फ्लॉप होत असल्याने तो पुन्हा पानमसाल्याच्या जाहिराती करतोय’, असं आणखी एक युजर म्हणाला.

जेव्हा अक्षय कुमारने मागितलेली माफी
“मला माफ करा. मी माझ्या सर्व चाहत्यांची आणि हितचिंतकांची तसेच तुम्हा सर्वांची माफी मागू इच्छितो. गेल्या काही दिवसात तुमच्या विविध प्रतिक्रिया मी वाचल्या. त्याचा माझ्यावर खोलवर परिणाम झाला आहे. मी याआधी कधीही तंबाखू यांसह इतर उत्पादनाचे समर्थन केलेले नाही आणि करणारही नाही,” असं त्याने माफी मागत म्हटलं होतं.