Akshay Kumar Talks About Twinkle Khanna : अक्षय कुमार व ट्विंकल खन्ना दोघे बॉलीवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिटी कपलपैकी एक आहेत. दोघेही अनेकदा एकमेकांचे भन्नाट किस्से सांगत असतात, तर अनेकदा एकमेकांबद्दलच्या स्पष्ट प्रतिक्रियाही देत असतात. अक्षयने ट्विंकल व काजोल यांच्या कार्यक्रमात सैफ अली खानबरोबर हजेरी लावलेली पाहायला मिळाली. त्यावेळी त्याने ट्विंकलबद्दलचा एक किस्सा सांगितला आहे.

अक्षय कुमार पत्नी ट्विंकलबद्दल म्हणाला, “लग्नासाठी होकार देण्याआधी ट्विंकलने पत्रिका पाहिली नव्हती. तिचा या सगळ्यांवर फार विश्वास नव्हता.” पुढे अभिनेता म्हणाला, “लोक जेव्हा लग्न करतात तेव्हा ते पत्रिका बघतात, पण तिचा त्यावर विश्वास नसल्याने तिने काय केलं माहितीये? तिने खात्री करून घेतली की माझ्या वडिलांना कुठला आजार आहे का, तिने माझ्या मामांची, काकांची, काकींची सगळ्यांची मेडिकल हिस्ट्री पाहिली आणि त्यानंतर तिने माझ्याबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला.”

अक्षय कुमार पुढे म्हणाला, “ती आगीसारखी आहे आणि मी पाण्यासाखा आहे. ती तिला वाटेल ते बोलत असते आणि मी फक्त स्वत:ला शांत ठेवून ऐकत असतो आणि ती बोलत असते ते ऐकण्याचा आणि समजण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला जे करायचं आहे ते करा, पण तुमची बायको काय म्हणते ते ऐकलं पाहिजे. प्रत्येक नवऱ्याने बायकोचं म्हणणं नीट ऐकलं पाहिजे.”

ट्विंकल खन्नाची प्रतिक्रिया

‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार ‘कॉफी विथ करण’च्या कार्यक्रमात २०१६ मध्ये ट्विंकलने लग्नाबद्दलच्या तिच्या विचाराबद्दल सांगितलेलं. ती म्हणालेली, “लग्न करण्यामागचं मुख्य कारण म्हणजे मुलं होणं. म्हणजेच तुम्ही त्या व्यक्तीचा आनुवंशिक(Genes) गुणधर्म तुमच्या कुटुंबात आणत आहात. मला जाणून घ्यायचं होतं की त्याच्या कुटुंबातील लोकांना काही आजार आहेत का? त्याच्या काकांचे डोक्यावरचे केस कोणत्या वयात कमी झाले? कांचन काकींचा मृत्यू कशामुळे झाला? वगैरे.”

दरम्यान, अक्षय व ट्विंकल यांनी १७ जानेवारी २००१ साली लग्न केलं होतं. ‘फिल्मफेअर’ मासिकाच्या फोटो शूटदरम्यान त्यांची भेट झालेली आणि लग्नाच्या एक वर्ष आधी ते डेट करत होते. गेली २४ वर्ष ते सुखाचा संसार करत असून बॉलीवूडमधील लोकप्रिय कपलपैकी ते एक आहेत.