अभिनेता अक्षय कुमार जवळपास ३५ वर्षांपासून अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. तो इंडस्ट्रीमध्ये त्याच्या शिस्तप्रिय लाइफस्टाइलसाठी ओळखला जातो. बॉलीवूडमधील इतर कलाकारांप्रमाणे तो रात्री उशिरा होणाऱ्या पार्ट्यांना जाणं टाळतो. तो रोज रात्री ९ वाजता झोपतो आणि पहाटे ४ वाजता उठतो. तो कडक डाएट पाळतो. ही दिनचर्या तो वर्षानुवर्षे पाळत आला आहे. अक्षयच दरवर्षी अनेक चित्रपट प्रदर्शित होतात, त्यामुळे तो कधीच ब्रेक घेत नाही, असं अनेकांना वाटतं. पण वर्षातून सुमारे १२५ दिवस विश्रांती घेतो, असा खुलासा अक्षयने केला आहे.
अक्षयने ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या तिसऱ्या सीझनच्या शेवटच्या भागात याबाबत माहिती दिली. तो म्हणाला, “मी ब्रेक घेतो. मी वर्षातून १२५ दिवसांची सुट्टी घेतो.” तो दररोज काम करतो हा गैरसमज दूर करत अक्षय म्हणाला, “यात ५२ रविवार, ४० दिवसांची उन्हाळी सुट्टी, ख्रिसमसला १२ दिवसांची सुट्टी आणि दिवाळीला ३ दिवसांची सुट्टी याचा समावेश आहे. मी दर तीन महिन्यांनी ७ दिवसांची सुट्टी देखील घेतो.”
अक्षय कुमारने सांगितलं वेळेचं महत्त्व
अक्षयने सांगितलं की त्याने स्वतःचे एक वेळापत्रक तयार केले आहे आणि तो त्याचे काटेकोरपणे पालन करतो. त्यामुळे त्याला काम आणि वैयक्तिक आयुष्य यातील समतोल साधण्यास मदत होते. तो म्हणाला, “आपल्या सर्वांकडे दिवसाचे २४ तास आणि वर्षाचे ३६५ दिवस असतात. आयुष्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे टाइम मॅनेजमेंट. मी इथे कोणालाही उपदेश देण्यासाठी आलो नाहीये, पण मी तुम्हाला एक गोष्ट नक्कीच शिकवेन, ती म्हणजे साधेपणा. आयुष्य कठीण करू नका. ताण घेऊ नका. ताण अत्यंत हानिकारक आहे.”
अक्षय पुढे म्हणाला, “मला माहित आहे की काही लोकांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो, तर काहींना नातेसंबंधांमध्ये संघर्ष करावा लागतो. मी एका लहान बेडरूममध्ये राहत होतो, ज्यामध्ये २४ लोक राहत होते. पण तुम्ही तुमचं आयुष्य सोपं करा. देवाने तुम्हाला आयुष्याचा आनंद घेण्यासाठी पृथ्वीवर पाठवलं आहे, कारण पृथ्वी स्वर्ग आहे.”
दरम्यान, अक्षय कुमारच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तो अलीकडेच सुभाष कपूरच्या ‘जॉली एलएलबी 3’ मध्ये झळकला. यात अर्शद वारसीदेखील मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाने रिलीजच्या अवघ्या पाच दिवसांत ६५ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. २०२५ मध्ये ‘स्काय फोर्स’, ‘केसरी चॅप्टर २’, ‘हाऊसफुल ५’ आणि ‘कन्नप्पा’ नंतर अक्षयचा हा पाचवा चित्रपट आहे.