Alia Bhatt’s ex-PA arrested : बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टची माजी व्यवस्थापक, मॅनेजर वेदिका शेट्टीला जुहू पोलिसांनी ७७ लाखांच्या फसवणूक प्रकरणी अटक केली आहे. वेदिकाने आलिया भट्टची प्रोडक्शन कंपनी ‘इटरनल सनशाइन प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड’ आणि अभिनेत्रीच्या वैयक्तिक खात्यातून पैसे काढून गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. आलिया भट्टच्या बनावट स्वाक्षऱ्या करून तिने ही आर्थिक फसवणूक केल्याचं म्हटलं जात आहे.
आलिया भट्टची आई सोनी राजदान यांनी वेदिका शेट्टीविरुद्ध आर्थिक गैरव्यवहाराची तक्रार दाखल केल्यानंतर जवळपास पाच महिन्यांनी तिला अटक करण्यात आली आहे. वेदिकाने आलिया भट्टच्या बनावट सह्या करून दोन वर्षांच्या कालावधीत पैसे काढले असा तिच्यावर आरोप आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेदिका शेट्टीने आलिया भट्टच्या बनावट सह्या करून जवळपास ७७ लाखांची फसवणूक केली आहे. सोनी राजदान यांच्या तक्रारीनंतर काही महिन्यांपूर्वी वेदिकाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. पोलिसांत तक्रार दाखल झाल्यावर वेदिका फरार झाली होती. ती सर्वात आधी राजस्थान, त्यानंतर कर्नाटक, पुणे आणि शेवटी बंगळुरुला पोहोचली. याचठिकाणी वेदिकाला अटक करण्यात आली आणि त्यानंतर मुंबईतील न्यायालयात हजर करण्यात आलं आहे.
वेदिका शेट्टी कोण होती?
वेदिकाने २०२१ मध्ये आलियाची पर्सनल असिस्टंट म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. या काळात तिला आर्थिक व्यवहारांशी संबंधित अनेक अधिकार देण्यात आले होते. हा खर्च आलियाचा प्रवास, मिटिंग आणि इतर कार्यक्रमांशी संबंधित आहे असं खोटं सांगून वेदिका अभिनेत्रीची दिशाभूल करायची. याशिवाय तिने ऑनलाइन टूल्सचा वापर करून खोटी बिलं देखील डिझाइन केली होती.
‘न्यूज १८’ च्या वृत्तानुसार, २०२३ ते २०२५ दरम्यान ‘इटरनल सनशाइन’च्या निधीतून तसेच आलियाच्या वैयक्तिक खात्यांमधून वेदिकाने ७६ लाख ९० हजार ८९२ रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. पोलीस आता तिच्या बँक खात्यांची आणि आर्थिक नोंदींची तपासणी करत आहेत. आलिया किंवा तिच्या टीमने अद्याप या प्रकरणावर कोणतेही निवेदन जारी केलेलं नाही. तसेच सध्या जुहू पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे.