पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं. एअर स्ट्राईक करून भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील ९ अड्डे उद्ध्वस्त केले. या सगळ्यानंतर तीन दिवस म्हणजेच १० मे पर्यंत हा संघर्ष सुरु होता.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं. आता याबाबत अभिनेत्री आलिया भट्टने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मात्र, आलियाला या पोस्टनंतर ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

आलिया लिहिते, “गेल्या काही रात्री या नेहमीपेक्षा फार वेगळ्या होत्या…जेव्हा एखादा देश श्वास रोखून धरतो तेव्हा हवेत वेगळ्या प्रकारची शांतता असते. गेल्या काही दिवसांपासून आपण ती भयाण शांतता अनुभवली. ती शांतता, कायम सतावणारी चिंता. प्रत्येकाच्या जेवणाच्या टेबलवर, प्रत्येकाशी संवाद साधताना तो तणाव जाणवत होता. देशाच्या विविध भागात, पर्वतरांगांमध्ये आपले सैनिक आपल्यासाठी सतर्क राहून लढा देत आहेत याची जाणीव प्रत्येकाच्या मनात आहे.”

अभिनेत्री पुढे म्हणाली, “आपण आज त्यांच्यामुळे आपल्या घरात सुरक्षित आहोत…आपलं संरक्षण करण्यासाठी ते लढा देत आहेत. त्यांच्यामुळे आपण सुखाने झोपू शकतोय. हे फक्त शौर्य नसून हा त्यांचा सर्वात मोठा त्याग आहे. आज त्या प्रत्येक गणवेशाच्या मागे एक आई उभी आहे, जी आपल्या पोटच्या मुलाच्या विचारात झोपली नाहीये… रविवारी आपण ‘मदर्स डे’ साजरा केला. आपण आईला फुलं देतो, मिठी मारतो पण, तेव्हा नकळत त्या मातांचा विचार येतो ज्यांनी खऱ्या नायकाला घडवलं आहे. त्या सगळ्या मातांचा खूप अभिमान वाटतो.”

“आज ज्या सैनिकांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलंय त्यांचं नाव प्रत्येकाच्या मनावर कोरलं गेलं आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी संपूर्ण देश आहे आणि त्यांना पुढील आयुष्य जगण्यासाठी बळ मिळो…यापुढे तणाव कमी होऊन सर्वत्र शांतता निर्माण होवो अशी प्रार्थना करते. आज असंख्य सैनिकांच्या पालकांनी प्रार्थना करून त्यांचे अश्रू रोखून धरले आहेत…तुमची ही शक्तीच या देशासाठी सर्वकाही आहे. या कठीण काळात आपण सगळे आपल्या संरक्षकांमुळे एकत्र आहोत…आपल्या भारतासाठी आपण एकत्र लढतोय…जय हिंद!” अशी पोस्ट आलिया भट्टने शेअर केली आहे.

मात्र, आलियाची ही पोस्ट वाचून नेटकऱ्यांनी तिला सुनावलं आहे. “एवढे दिवस तणाव सुरू होता…तू फार लवकर पोस्ट शेअर केलीस”, “यांना हिरो-हिरोईन मानू नका…सैनिकच आपले खरे हिरो आहेत”, “आता PR मुळे पोस्ट शेअर केलेली आहे…ही पोस्ट पण पीआरनेच लिहिलेली असेल”, “अनफॉलो केलं पाहिजे”, “आलियाला खूप लवकर जाग आलीये”, “अचानक कशी जाग आली आलिया?” अशा असंख्य कमेंट्स अभिनेत्रीच्या पोस्टवर आल्या आहेत.

तर, काही नेटकऱ्यांनी, “आता आलियानंतर हळुहळू सगळेच बॉलीवूड कलाकार त्यांच्या पीआरचं ऐकून सोशल मीडिया पोस्ट शेअर करतील” असंही कमेंट्समध्ये म्हटलं आहे.