आलिया भट्ट व रणबीर कपूर आई-बाबा झाले असल्याचं समजताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भट्ट व कपूर कुटुंबीय सध्या आलियाच्या लेकीच्या आगमनाची तयारी करत आहेत. दोन्ही कुटुंबामध्ये उत्साहाचं तसेच आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. भट्ट व कपूर कुटुंबातील मंडळींनी सोशल मीडियाद्वारे खास पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये महेश भट्ट लेक आलियाबाबत भरभरून बोलले आहेत.
आणखी वाचा – आलिया भट्ट व रणबीर कपूर झाले आई-बाबा अन् चर्चेत आला करण जोहर, मीम्स पाहून तुम्हालाही हसू होईल अनावर
‘एबीपी न्यूज’च्या वृत्तानुसार, महेश भट्ट यांनी एका मुलाखतीमध्ये आपला आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “मी याक्षणी माझा आनंद शब्दांमध्ये व्यक्त करू शकत नाही. आलिया व रणबीरला ही मुलगी एकमेकांच्या आणखीन जवळ आणणार. तो क्षण आमच्यासाठी खूपच खास होता. छोटीशी आलिया अगदी कालपर्यंत माझ्या कुशीमध्ये खेळायची आज ती स्वतः आई झाली आहे.”
पुढे ते म्हणाले, “जेव्हा मला माझी पत्नी सोनीचा फोन आला आणि तिने म्हटलं की, आलियाला मुलगी झाली आहे. ज्या शब्दांमध्ये सोनीने मला ही आनंदाची बातमी सांगितली तो क्षण मी शब्दांमध्ये सांगणं कठीण आहे. मुलीच्या जन्मामुळे घर आता मोठं झालं आहे.” महेश भट्ट यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे हे त्यांच्या बोलण्यामधूनच कळून येतं.
आणखी वाचा – मुंबई सोडून पुन्हा कुठे निघाली प्रियांका चोप्रा? व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “घरी पुन्हा…”
आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचं लग्न १४ एप्रिल २०२२ रोजी मुंबईत झालं. लग्नानंतर दोन महिन्यांनी म्हणजे जून महिन्याच्या अखेरीस आपण गरोदर असल्याचं आलियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं. यानंतर आलिया भट्ट ही २० ते ३० नोव्हेंबर या दिवसांमध्ये बाळाला जन्म देऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्यापूर्वीच गिरगावातील ‘एच.एन.रिलायन्स’ रुग्णालयात आलियाने तिच्या बाळाला जन्म दिला.