Anil Kapoor’s son Harshvardhan Kapoor Career: बॉलीवूडच्या लोकप्रिय कलाकारांची मुले काय करतात, ते त्यांच्या पालकांप्रमाणेच मनोरंजनसृष्टीत काम करणार की वेगळी वाट निवडणार, असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडलेले असतात. कलाकारांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

हर्षवर्धन कपूर सध्या काय करतो?

अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन कपूर काय करतो, हे तुम्हाला माहीत आहे का? आज हर्षवर्धन कपूरचा वाढदिवस आहे, या निमित्ताने त्याच्याबद्दल अधिक जाणून घेऊ…

हर्षवर्धनचा जन्म ९ नोव्हेंबर १९९० ला झाला होता. त्याने त्याच्या करिअरची सुरुवात सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. अनुराग कश्यप दिग्दर्शित बॉम्बे वेल्वेट हा चित्रपट २०१४ ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात हर्षवर्धनने सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले होते.

सहायक दिग्दर्शक म्हणून काम केल्यानंतर हर्षवर्धनने २०१६ ला अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्याने ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘मिर्ज्या’ चित्रपटातून पदार्पण केले होते. या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करू शकला नाही. त्यानंतर अभिनेत्याने भावेश जोशी सुपरहीरो या चित्रपटात एक वेगळ्या धाटणीची भूमिका साकारली होती. मात्र, या चित्रपटालादेखील फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

या दोन चित्रपटांनंतर हर्षवर्धन वडील अनिल कपूर यांच्या एके वर्सेस एके या चित्रपटात दिसला होता. त्याने या चित्रपटात एक छोटी भूमिका साकारली होती. त्यानंतर त्याने अनिल कपूर यांच्याबरोबर २०२२ मध्ये आलेल्या थार चित्रपटात स्क्रीन शेअर केली होती. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता.

त्यानंतर हर्षवर्धन चित्रपटांपासून दूर असल्याचे पाहायला मिळत आहे. तरीही अभिनेता चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच त्याने मुंबईत सुमारे पाच कोटींचा एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे. हे घर द स्मोकी हिल सीएचएस लिमिटेडमध्ये आहे आणि त्याचे क्षेत्रफळ सुमारे ९७० चौरस फूट आहे.

हर्षवर्धनला चित्रपटांमध्ये फारसे यश मिळाले नसले तरी त्याची आलिशान जीवनशैली आणि रिअल इस्टेटमधील त्याच्या गुंतवणुकीमुळे तो लक्ष वेधून घेत आहे. तो फिटनेस, फॅशन आणि कलाप्रेमी आहे. तो सोशल मीडियावर त्याच्या स्टायलिश फोटोंद्वारे अनेकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो.

दरम्यान, आता तो आगामी काळात कोणत्या चित्रपटातून दिसणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.