सनी देओल व अमीषा पटेल यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘गदर २’ हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. तब्बल २२ वर्षांनी ‘गदर एक प्रेम कथा’चा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. पण आता अशातच अमीषा पटेलला प्रेक्षक वयावरून ट्रोल करू लागले. आता अशांना तिने सडेतोड उत्तर दिलं आहे.
या चित्रपटाची कथा, या चित्रपटातील ॲक्शन, या चित्रपटातील कलाकारांची कामं हे सर्वच प्रेक्षकांना आवडलं. या चित्रपटाने ५०० हून अधिक कोटींची कमाई केली आहे. पण या चित्रपटात सकीना आणि तारा सिंग यांना खूप कमी स्क्रीन टाइम असल्याने प्रेक्षक नाराज झाले. त्यामुळे ‘गदर ३’मध्ये कमी रोल असेल तर तो चित्रपट करणार नाही असं वक्तव्य अमीषा पटेलने केलं होतं. तर आता त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत.
अमीषाच्या या चित्रपटातील भूमिकेवर काही जणांनी टीका केली. या चित्रपटामध्ये सकीनाची भूमिका साकारणारी अमीषा खूपच म्हातारी वाटत असल्याचंही म्हटलं गेलं. आता त्याला अमीषाने उत्तर दिलं आहे. ती म्हणाली, “सनी देओलचं वय ६५ असलं तर तुम्हाला चालतं, पण मला मात्र म्हातारी म्हणायचं तर हे काही बरोबर नाही. नेटकरी नेहमीच मला वयावरुन बोलतात.”
पुढे ती म्हणाली,”मला त्यांना सांगायचं आहे की, वय हा नेहमीच एक आकडा राहिला आहे. माझं वय जरी हे पन्नाशीच्या जवळ असलं तरी मी अजूनही २० वर्षाच्या एखाद्या अभिनेत्री प्रमाणे काम करते हे लक्षात घ्या. लोकं बोलताना काहीही विचार करत नाहीत. तुम्हाला अभिनेत्याचं वय जास्त असलं तरी चालतं, पण अभिनेत्रीच्या वयाबद्दल तुम्ही फारच विचार करता.”