Amitabh Bachchan donation to Lalbaugcha Raja : देशभरात सगळीकडे गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. सेलिब्रिटींच्या घरीही गणरायाचं आगमन झालं आहे. अनेक सेलिब्रिटी मुंबईतील विविध मंडळाच्या गणरायाचे दर्शन घेत आहेत. अमिताभ बच्चनदेखील गणरायाचे भक्त आहेत.
दरवर्षी बिग बी आपल्या कुटुंबासह मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाला भेट देतात. यावर्षी अद्याप ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेले नाहीत, पण त्यांनी देणगी पाठवली आहे. त्यांनी लालबाग गणपती समितीला ११ लाख रुपयांची देणगी दिली आहे.
विरल भयानी या पापाराझी अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत लालबागच्या राजाचे सेक्रेटरी सुधीर साळवी हातात एक धनादेश घेऊन गणपती बाप्पासमोर उभे आहेत. त्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये अमिताभ बच्चन यांनी लालबागच्या राजाला ११ लाख रुपयांची देणगी दिली, ती सेक्रेटरी सुधीर साळवी यांनी स्वीकारली असं लिहिलं आहे.
पाहा व्हिडीओ-
दरवर्षीप्रमाणे यंदाही शिल्पा शेट्टी, मलायका अरोरा, जान्हवी कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, जॅकलिन फर्नांडिस यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. इतरही अनेक सेलिब्रिटी बाप्पाच्या दर्शनासाठी जात आहेत. त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकही लालबागच्या राजच्या चरणी नतमस्तक होत आहेत.
दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ते सध्या ‘कौन बनेगा करोडपती १७’ होस्ट करत आहेत. अमिताभ बच्चन अलिकडे कोणत्या चित्रपटात दिसले नाहीत, तसेच त्यांच्या आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती समोर आलेली नाही.
इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, अमिताभ बच्चन व शाहरुख खान यांना ‘डॉन ३’ साठी विचारणा झाली आहे. पण अद्याप त्यांनी याबाबत अधिकृतपणे काही कळवलेलं नाही. डॉन ३ मध्ये किंग खान व बिग बींची वर्णी लागल्यास ती चाहत्यांसाठी पर्वणी ठरेल.