Amitabh Bachchan Reacted to Troll : बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेते अमिताभ बच्चन नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची मतं माडंत असतात. सामाजिक विषयांवर ते नेहमीच त्यांच्या प्रतिक्रिया देत असतात. एक्सवर ते विशेष सक्रिय असतात. यावरून ते अनेकदा त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनबद्दलही लिहीत असतात. अशातच नुकतच त्यांनी सोशल मीडियामार्फत अभिषेकच्या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. परंतु, यादरम्यान एका नेटकऱ्याने त्यांच्या एक्स पोस्टखाली ते फक्त अभिषेकचंच कौतुक करतात आणि कधी मुलीचं, सुनेचं किंवा पत्नीचं कौतुक करीत नाही, असं लिहिलं होतं.
अमिताभ यांनी यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. अमिताभ बच्चन तसे ट्रोलर्सना फार उत्तरं देत नाहीत. मात्र, आता त्यांनी या नेटकऱ्याच्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे. अमिताभ यांनी एक्सवर अभिषेक बच्चनचं त्याचा आगामी चित्रपट ‘कालिधर लापता’साठी कौतुक केलं होतं. यावेळी त्यांनी नेटकऱ्याची ती कमेंट पाहून, प्रतिक्रिया देत म्हटलं, “हो मी त्यांचं मनोमन कौतुक करतो: पण सोशल मीडियावर सर्वांसमोर नाही. कारण- मी स्त्रियांचा आदर करतो”.
अमिताभ यांनी यासह ट्रोल करणाऱ्या अजून एका नेटकऱ्याला प्रत्युत्तर दिलं आहे. एक्स पोस्टखाली अमिताभ यांच्या जलसा बंगल्याजवळ असणारे त्यांचे चाहते बेरोजगार आहेत, असं एकानं म्हटलं होतं. त्यावर अभिनेत्यानं, “मग तुम्ही त्यांना रोजगार द्या”, असं म्हटलं आहे. त्यासह त्यांनी त्यांचे चाहते पैसे देऊन आणलेली माणसं आहेत, असं म्हणणाऱ्याला उत्तर देत म्हटलं, “तुमची बौद्धिक क्षमता छोटी आहे. आणि असं असेल, तर तुम्हीसुद्धा पैसे देऊन असं करू शकता”.
अमिताभ बच्चन यांनी गेल्या काही दिवसांमध्ये मुलगा अभिषेक बच्चनच्या ‘कालिधर लापता’ या चित्रपटासंबंधित अनेक पोस्ट केल्या. त्यातील एकामध्ये त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारण्यासाठी त्याचं कौतुक केलं होतं. तर दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी अभिषेकचा उल्लेख करीत “तुझ्यासारखा मुलगा मिळाला यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो”, असं म्हटलं होतं. दरम्यान, अभिषेक बच्चन नुकताच ‘हाऊसफुल ५’ या चित्रपटातून झळकला होता. त्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता तो ‘कालिधर लापता’ या चित्रपटातून झळकणार आहे.