नुकताच अमिताभ बच्चन यांचा ‘गुडबाय’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद दिला. रश्मिका मंदाना हिने या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. आता याच वर्षी अमिताभ आणखी एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. पुढच्या महिन्यामध्ये त्यांचा राजश्री प्रोडक्शनमध्ये बनलेला ‘ऊंचाई’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी प्रेक्षक चांगलेच उत्सुक आहेत.
काही दिवसांपूर्वी त्यांच्या ‘ऊंचाई’ या चित्रपटाचे नवे पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केले. या पोस्टरद्वारे या चित्रपटातला त्यांचा लूक समोर आला होता. अमिताभ यांच्या पाठोपाठ अभिनेते अनुपम खेर यांचाही या चित्रपटातील लूक समोर आला होता. आता या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
आणखी वाचा : Photos : ५६ वर्षाचा दबंग सलमान खान, जाणून घ्या त्याच्या फिटनेसमागचं रहस्य
२ मिनिटं ५० सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये या चित्रपटसृष्टीत मुरलेले कलाकार आणि त्यांची जुगलबंदी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. चित्रपटाची कथा ६० वर्षं पार केलेल्या ४ मित्रांच्या भोवती लिहिली गेली आहे. या ४ पैकी एका मित्राचं निधन होतं, आणि केवळ त्या मित्राची इच्छा पूर्ण करण्यासाठी उरलेले तिघे मित्र हे माऊंट एव्हरेस्ट शिखर चढायचं ठरवतात. असं एकंदर या चित्रपटाचा ट्रेलर बघून अंदाज येत आहे.
या प्रवासात या मित्रांचे नाते आणखीन कसे घट्ट होते, त्यांना कोणत्या अडचणी येतात, याबरोबरच त्यांच्या कुटुंबाचा यामध्ये सहभाग काय आहे, हे शिखर पार करण्यात त्यांची मदत कोण करणार आहे, या सगळ्याचा खुलासा चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच होईल. प्रेक्षकांनी या ट्रेलरला पसंती दर्शवली असून प्रेक्षक या मुरलेल्या कलाकारांना एकत्र पडद्यावर बघण्यासाठी उत्सुक आहेत.
दिग्दर्शक सुरज बडजात्या हे बऱ्याच वर्षांनी दिग्दर्शक म्हणून समोर येणार आहेत. चित्रपटात अमिताभ बच्चन, बोमन इराणी, अनुपम खेर आणि डॅनी डेन्जोंगपा हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याबरोबरच नीना गुप्ता, सारिका, परिणीती चोप्रा यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. ११ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.