बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक ब्लॉकबस्टर हिट आणि कल्ट क्लासिक चित्रपट दिले आहेत. १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या त्यांच्या ‘डॉन’ चित्रपटाला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. ‘डॉन’ हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे. पण या चित्रपटाने चित्रपटाच्या निर्मात्याचे आयुष्य मात्र बरबाद केले होते. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच निर्मात्याचे निधन झाले होते.
‘डॉन’ चित्रपटाची निर्मिती नरिमन इराणी यांनी केली होती. या चित्रपटामुळे ते दिवाळखोर झाले होते. निर्माता म्हणून हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला होता, कारण प्रीमियरपूर्वीच त्यांचे निधन झाले होते. त्यांच्यावर इतके कर्ज होते की चित्रपटातून मिळालेला नफा कर्ज फेडण्यासाठी वापरला होता. एका मुलाखतीत, गीतकार समीर अंजान यांनी चित्रपटाच्या निर्मितीची आठवण सांगितली. पैसे नसतानाही जावेद अख्तर यांनी चित्रपटासाठी नवीन गाणं शूट करण्याचा आग्रह धरला होता. ते गाणं होतं “खइके पान बनारस वाला”. हे गाणं समीरचे वडील अंजान यांनी लिहिलं होतं.
समीरच्या वडिलांना पुढील हरिवंशराय बच्चन करणार, असे वचन त्यांच्या गुरूने दिलं होतं. डीडी उर्दूला दिलेल्या मुलाखतीत समीर म्हणाले, “पण माझ्या वडिलांना हे माहित नव्हतं की ‘खइके पान बनारस वाला’ या गाण्यामुळे ते पुढील हरिवंश राय बच्चन होण्याऐवजी अमिताभ बच्चन यांच्याशी कायमचे जोडले जातील. आजही अमिताभ बच्चन यांचा उल्लेख केला की या गाण्याचाही उल्लेख होतोच. पण तुम्हाला माहित आहे का की हे गाणं चित्रपटात नव्हतं?”
‘डॉन’च्या कमाईतून फेडलेले इराणींचे कर्ज
नरिमन इराणी यांनी ‘जिंदगी जिंदगी’ नावाच्या चित्रपटाची निर्मिती केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला होता. हा चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे त्यांच्यावर १२,००,००० रुपयांचे कर्ज झाले होते. त्यांनी हे कर्ज फेडण्यासाठी ‘डॉन’ चित्रपट बनवला होता, असं म्हटलं जातं. पण शूटिंग दरम्यान त्यांच्याबरोबर एक दुर्दैवी घटना घडली. ‘डॉन’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अचानक ढगफुटीमुळे वीज पडली आणि नरीमन गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, नंतर त्यांचे निधन झाले. पण चित्रपटाचे शूटिंग थांबले नाही. चित्रपट पूर्ण करून प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि ‘डॉन’ने जबरदस्त कमाई केली होती. या चित्रपटाच्या कमाईतून नरिमन इराणी यांच्यावरील कर्ज फेडण्यात आले होते.