Amitabh Bachchan Praises Agastya Nanda : अमिताभ बच्चन बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय हे देखील बॉलीवूडमधील लोकप्रिय कलाकार आहेत. यासह त्यांचा नातू अगस्त्य नंदानेही गेल्या वर्षी पदार्पण केलं असून आता लवकरच तो एका नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच आता बिग बींनी त्यांच्या नातवाचं कौतुक केलं आहे.

अगस्त्य नंदा हा अमिताभ बच्चन यांच्या मुलीचा म्हणजेच श्वेता बच्चनचा मुलगा आहे. त्याने जोया अख्तरच्या ‘द अर्चिज’मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर आता तो Ikkis या चित्रपटातून झळकणार आहे. श्रीराम राघवन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यानिमित्तानेच अमिताभ यांनी त्यांच्या नातवाचं कौतुक केलं आहे.

काल २९ ऑक्टोबर रोजी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यामध्ये अगस्त्य नंदा मुख्य भूमिकेत असून त्याच्याबरोबर या चित्रपटात अभिनेते धर्मेंद्र, जयदीप अहलावत, सिकंदर खेर हे कलाकार झळकणार आहेत. यातील अगस्त्यचं काम पाहून त्याचे आजोबा बिग बींनी त्याचं कौतुक करत पोस्ट शेअर केली आहे.

अमिताभ बच्चन यांनी केलं नातवाचं कौतुक

अमिताभ यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत म्हटलं की, “अगस्त्य तुझा जन्म झाला तेव्हा पहिल्यांदा सगळ्यात आधी मीच तुला माझ्या हातात घेतलं होतं. त्यानंतर काही महिन्यांनी तू थोडा मोठा झाल्यानंतर मी जेव्हा पुन्हा तुला कुशीत घेतलं, तेव्हा मात्र तू माझ्या दाढीतील केसांबरोबर खेळत होतास. आज तू जगभरातील थिएटरमध्ये झळकत आहेस. तू खूप खास आहे. माझ्या प्रार्थना आणि आशीर्वाद तुझ्याबरोबर आहेत. तुझ्या कामामुळे कायम कुटुंबाला अभिमान वाटेल असं काम कर.”

आजोबा अमिताभ यांनी कौतुक केल्यानंतर अगस्त्यचे वडील उद्योजक निखिल नंदा यांनीसुद्धा फेसबुकवर पोस्ट शेअर करत त्याचं कौतुक केलं. त्यांनी यामधून लिहिलं की, “काही गोष्टींमुळे तुम्हाला खूप अभिमान वाटतो. Ikkis चा ट्रेलर पाहून मला एका क्षणासाठी खूप अभिमान वाटला. एक वडील म्हणूनसुद्धा आणि एक भारतीय म्हणूनसुद्धा. अगस्त्य यामध्ये साकारत असलेली अरुण खेत्रपाल यांची भूमिका ही त्यांच्या कार्याला अभिवादन करणारी आहे. अगस्त्य तुला खूप सुभेच्छा.”

निखिल नंदा फेसबुक पोस्ट

श्रीराम राघवन यांनी दिग्दर्शन केलेला आणि मॅडडॉकची निर्मिती असलेला Ikkis हा चित्रपट येत्या डिसेंबर २०२५ मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यामधून अगस्त्य पहिल्यांदाच धर्मेंद्र यांच्याबरोबर काम करणार आहे.