अमिताभ बच्चन यांनी गेल्या वर्षी त्यांची मुलगी श्वेता बच्चनला तिच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा ५० कोटींचा प्रतीक्षा बंगला भेट म्हणून दिला होता. परंतु, अमिताभ बच्चन यांचा हा बंगला ही केवळ वास्तू नसून, ती त्यांच्या आयुष्यात घडलेल्या अनेक गोष्टींची साक्षीदार आहे. अमिताभ बच्चन व जया बच्चन यांनी एकत्रित खरेदी केलेला हा त्यांचा पहिला बंगला आहे. तर बंगल्याला दिलेले प्रतीक्षा हे नाव त्यांचे वडील हरिवंश राय बच्चन यांनी दिलं होतं.

अमिताभ व जया यांची दोन्ही मुलं श्वेता बच्चन व अभिषेक बच्चन यांचा जन्म याच बंगल्यात झाला होता. एवढेच नव्हे, तर अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय यांचं लग्नदेखील याच बंगल्यात झालं होतं. २००७ साली अभिषेक व ऐश्वर्या यांनी याच बंगल्यात घरातील ज्येष्ठ मंडळींच्या साक्षीनं लग्न केलं होतं. शोले हा चित्रपट हिट झाल्यानंतर अमिताभ बच्चन व जया बच्चन यांनी हा बंगला खरेदी केला होता. त्यावेळी यांच्या लग्नाला तीन वर्षं झाली होती. अमिताभ बच्चन व जया बच्चन अमिताभ यांच्या आई-वडिलांसह १९७६ साली या बंगल्यात राहायला गेले होते.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये या बंगल्याचा उल्लेख करताना लिहिलं आहे की, त्यांची मुलं, नातवंडं यांचा जन्म या घरात झाला. त्यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाचे कार्यक्रमही इथेच झाले. या ब्लॉगमध्ये त्यांनी असंही म्हटलं आहे की, जेव्हा त्यांची नात आराध्याचा जन्म झाला होता, तेव्हा ते त्यांच्या जलसा बंगल्यात राहायला गेले होते. परंतु, तिच्या जन्मानंतर ते तिला आधी प्रतीक्षा बंगल्यात घेऊन गेले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमिताभ बच्चन यांच्या आई तेजी बच्चन यांच्या निधनानंतर बच्चन कुटुंबीय ‘प्रतीक्षा’ बंगल्यातून ‘जलसा’ बंगल्यात राहण्यासाठी गेले होते. त्यानंतर जवळपास २० वर्षं हा बंगला बंद होता. परंतु, त्यातील त्यांच्या आई-वडिलांच्या आठवणी अमिताभ यांनी जपून ठेवल्या आहेत. काही माध्यमांच्या वृत्तानुसार गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यांनी त्यांचा हा ५० कोटींचा बंगला मुलगी श्वेता बच्चन-नंदा हिला वाढदिवसानिमित्त भेट म्हणून दिल्याचं म्हटलं जातं.