Amitabh Bachchan’s Reaction on Aishwarya Rai’s Hollywood Career : प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर त्याच्या ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमामुळे विशेष चर्चेत असतो. या कार्यक्रमामार्फत अनेकदा तो कलाकारांना कोड्यात पाडणारे प्रश्न विचारत असतो. २००४ साली त्याच्या या कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. ‘कॉफी विथ करण’च्या पहिल्या सीझनमधील एपिसोडचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय व संजय लीला भन्साळी यांनी हजेरी लावली होती.
‘कॉफी विथ करण’च्या पहिल्या सीझनच्या चौथ्या भागात ऐश्वर्या राय व संजय लीला भन्साळी उपस्थित होते. यावेळी करणने ऐश्वर्याला एक व्हिडीओ दाखवला. यामध्ये सगळ्यांना ऐश्वर्याच्या हॉलीवूडमधील कामाबद्दलचं त्यांचं मत विचारण्यात आलं होतं. यावर अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन, सुश्मिता सेन यांसारख्या अनेक कलाकारांनी ऐश्वर्या रायबद्दलची मतं व्यक्त केली होती. अभिषेक ऐश्वर्या रायच्या हॉलीवूडमधील करिअरबद्दल म्हणाला, “ती खूप हुशार आहे. सहकलाकार म्हणूनही काम करण्यासाठी ती एक उत्तम व्यक्ती आहे, त्यामुळे नक्कीच ती हॉलीवूडमध्ये चांगलं काम करू शकते.”
अभिषेकसह अमिताभ बच्चन यांनीसुद्धा यावर त्यांचं मत मांडलं होतं. ऐश्वर्याच्या हॉलीवूडमधील करिअरबद्दल ते म्हणाले होते, “ती एका टप्प्यापर्यंत जाईल, पण त्यापुढे नाही जाणार.” अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्याबद्दल मत व्यक्त केलं तेव्हा अभिषेक व ऐश्वर्याचं लग्न झालेलं नव्हतं. या दोघांनी २००७ साली लग्न केलं आणि २०११ साली त्यांची मुलगी आराध्याचा जन्म झाला. अभिषेक व अमिताभ यांच्यासह संजय दत्त, शबाना आझमी, सुश्मिता सेन यांसारख्या कलाकारांनीही ऐश्वर्याच्या हॉलीवूडमधील करिअरबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दरम्यान, ११९४ मध्ये विश्व सुंदरीचा खिताब जिंकल्यानंतर तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. ‘देवदास’, ‘हम दिल दे चुके सनम’ यांसारख्या चित्रपटांनंतर तिने ‘ब्राइड अँड प्रीजुडाइस’ या चित्रपटातून २००४ साली हॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर ऐश्वर्या स्टीव्ह मार्टिनसह ‘द मिस्ट्रेस ऑफ स्पाइसेस’, ‘प्रोव्होक्ड’ आणि ‘द पिंक पँथर २’ यांसारख्या हॉलीवूड चित्रपटांमध्ये झळकली होती.