Amitabh Bachchan Expressed His Regret : अमिताभ बच्चन बॉलीवूडमधील दिग्गज व्यक्तिमत्त्व आहे. आजवर अनेक चित्रपटांत विविध भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ९० च्या दशकाचा काळ त्यांनी गाजवला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण, असं असलं तरी अमिताभ बच्चन यांना आजही एक खंत आहे.
अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या ‘कोन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाच्या एका भागात त्यांनी त्यांच्या कुटुंबाबद्दल सांगितलं. ‘सोनी टीव्ही’ वाहिनीच्या सोशल मीडिया पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यामध्ये त्यांनी त्यांना असलेली खंत व्यक्त केली आहे.
अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केली खंत
अमिताभ बच्चन त्या व्हिडीओमध्ये म्हणाताना दिसतात, “आमच्याकडे वातावरण खूप साधारण होतं. मी कामावर जायचो आणि जया मुलांना सांभाळायच्या. त्यांनी सगळं पाहिलं आहे; पण माझ्या मनात एक खंत आहे की, मला मुलांबरोबर फार वेळ घालवता आला नाही. कारण- मी सकाळपासून रात्रीपर्यंत दिवसभर काम करायचो. जेव्हा सकाळी कामासाठी बाहेर जायचो तेव्हा मुलं झोपलेली असायची आणि रात्री घरी यायचो तेव्हासुद्धा मुलं झोपलेली असायची. त्यामुळे वेळ नाही मिळाला म्हणून जयानंच त्यांना सांभाळलं.”
अमिताभ बच्चन पुढे म्हणाले, “कधी कधी असं वाटतं की, मलाही अभिषेक किंवा श्वेताबरोबर वेळ घालवता आला असता तर.. पण मग असं ठरलं की, मी सुटीच्या दिवशी काम करणार नाही. त्या दिवशी मग आम्ही मुलांबरोबर खेळायचो, त्यांच्याबरोबर वेळ घालवायचो आणि आजही आमच्या घरी ही प्रथा सुरू आहे. सुटीच्या दिवशी म्हणजेच रविवारी दिवसातून एका वेळचं जेवण सर्व कुटुंबीय एकत्र बसून करणार.”
दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्याबद्दल बोलायचं झालं तर, त्यांनी आजवर अनेक चित्रपटांत काम करीत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. लवकरच ते काही आगामी चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अभिनेते याव्यतिरिक्त सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि त्यामार्फत ते अनेकदा विविध गोष्टींबद्दलची त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करीत असतात.