Amitabh Bachchan Was Replaced In Movies : अमिताभ बच्चन हे बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आहेत. आजही त्यांची प्रेक्षकांमध्ये पूर्वीसारखीच क्रेझ कायम आहे. आजही ते त्यांच्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकतात. परंतु, एक काळ असा होता जेव्हा त्यांचे चित्रपट फ्लॉप ठरत होते. तेव्हा निर्माते त्यांना चित्रपटात घ्यायचे नाहीत. अशातच लोकप्रिय दिग्दर्शिकेनं याबाबत सांगितलं आहे.
अरुणा राजे पाटील यांनी अमिताभ बच्चन यांच्याबद्दल सांगितलं आहे. त्यांनी सततच्या फ्लॉप चित्रपटांमुळे निर्माते बिग बींना चित्रपटात भूमिका द्यायचे नाहीत याबाबत सांगितलं आहे. तर त्यामुळेच एका चित्रपटातून अमिताभ यांना रिप्लेस करण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ‘बॉलीवूड क्रिप्ट’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी याबाबत सांगितलं आहे.
अरुणा यांनी १९७६ रोजी आलेल्या ‘शक’ चित्रपटातून अमिताभ बच्चन यांना रिप्लेस करण्यात आल्याबद्दल सांगितलं आहे. त्या म्हणाल्या, “चित्रपटाचे निर्माते ठाम होते की, त्यांना अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करायचं नव्हतं. कारण- त्यावेळी त्यांचा बॉक्स ऑफिस रेकॉर्ड खराब होता.”
अरुणा पुढे म्हणाल्या, “‘शक’ चित्रपटासाठी आमची पहिली पसंती अमिताभ बच्चन व वहिदा रहमान यांना होती. परंतु, अमिताभ यांचा चित्रपट फ्लॉप ठरल्याने निर्माते एन. बी. कामत यांनी अमिताभ बच्चन यांची निवड करण्यास नकार दिला. ते आम्हाला म्हणाले, “हा चित्रपट होऊ शकत नाही. म्हणून आम्ही म्हटलं की ठीक आहे; मग कोणाची निवड करायची? तेव्हा त्यांनी आम्हाला दुसऱ्या अभिनेत्याची निवड करा, ज्याची ओळख असेल, असं सांगितलं. त्यामुळे आम्ही विनोद खन्ना यांचा विचार केला. त्यानंतर कामत यांची त्यांच्यासह मीटिंग झाली आणि त्यांनी या चित्रपटासाठी होकार दिला.”
‘असा’ मिळाला अमिताभ बच्चन यांना ‘जंजीर’ चित्रपट
अरुणा पुढे अमिताभ यांच्या ‘जंजीर’ चित्रपटाबद्दल म्हणाल्या, त्यांच्या नशिबातच तो चित्रपट होता. त्या म्हणाल्या, “दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांनी ‘जंजीर’साठी आधी दिलीप कुमार, धर्मेंद्र, देव आनंद, राजकुमार यांना विचारलं होतं. हा चित्रपट पूर्णपणे नायकावर आधारित होता. तरीसुद्धा त्यातील प्रत्येकानं काहीतरी कारणांमुळे चित्रपटासाठी नकार दिला. नंतर अमिताभ यांना विचारणा झाली. ज्यावेळी त्यांना कोणीही चित्रपटासाठी विचारत नव्हतं आणि प्रकाश मेहरा यांच्याकडे काही पर्याय नव्हता तेव्हा जया यांनी दिग्दर्शकांना अमिताभ यांचं नाव सुचवलं आणि नंतर जे घडलं ते सर्व जण जाणतात.”
‘जंजीर’च्या यशानंतर अमिताभ ‘दीवार’, ‘शोले’, ‘काला पत्थर’, ‘त्रिशूल’, ‘मजबूर’, ‘डॉन’ यांनासारख्या चित्रपटांत झळकले. त्यातून मग ते खऱ्या अर्थाने नावारूपाला आले.