Amitabh Bachchan works for 16 hours: अमिताभ बच्चन जवळजवळ ५६ वर्षांपासून चित्रपटसृष्टीत काम करत आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचे मेकअप आर्टिस्ट दीपक सावंतदेखील दीर्घकाळापासून काम करत आहेत. गेली ५३ वर्षे ते एकत्र काम करत आहेत.
दीपक सावंत आणि अमिताभ बच्चन यांची पहिली भेट १९७२ साली ‘रास्ते का पत्थर’ या चित्रपटादरम्यान झाली. त्यानंतर त्यांच्यातील बॉण्डिंग उत्तम झाले. दीपक सावंत यांनी निर्मिती केलेल्या गंगोत्री, गंगा देवी या भोजपूरी चित्रपटात देखील अमिताभ बच्चन यांच्या भूमिका पाहायला मिळाल्या. तसेच, जया बच्चन यांनी दीपक सावंत यांच्या चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या.
“मी देवाला अनेकदा सांगतो की माझा तुझ्यावर…”
आता दीपक सावंत यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अमिताभ बच्चन यांच्याबाबत, त्यांच्याबरोबर असलेल्या बॉण्डिंगबाबत वक्तव्य केले. दीपक सावंत यांनी ‘रील टू रील’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत ते म्हणाले, “अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाल्याने मी स्वत:ला नशीबवान समजतो. मी देवाला अनेकदा सांगतो की माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि तुझ्यानंतर मला अमिताभ बच्चन यांच्यावर विश्वास आहे.”
“अमिताभ बच्चन यांना सेटवर येण्याची जी वेळ…”
“अमिताभ बच्चन यांनी माझ्याप्रति जो आदर दाखवला आहे, ज्या पद्धतीने ते माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर प्रेम करतात, ते मी शब्दात सांगू शकत नाही. त्यांचा स्वभाव असा आहे की मी त्यांच्यासाठी काहीही करु शकतो. जर कधी वेळ पडलीच मी त्यांच्यासाठी भांडूदेखील शकतो. जर गोष्ट अमिताभ बच्चन यांची असेल तर मी माझ्या आयुष्याचादेखील विचार करणार नाही.”
अमिताभ बच्चन यांच्या कामाबाबत दीपक सावंत म्हणाले, “अमिताभ बच्चन यांना सेटवर येण्याची जी वेळ दिली जाते, त्यापेक्षा ते ३० मिनिट आधी पोहोचतात. जर गरज असेल तर ते सलग १६ तास काम करतात. ते तोपर्यंत काम करतात, जो पर्यंत निर्माते जायला सांगत नाहीत. करिअरच्या अगदी सुरुवातीपासून अमिताभ बच्चन कामाप्रति असेच समर्पित आहेत. आजही ते या गोष्टींचे पालन करतात.”
पुढे ते म्हणाले, “मी त्यांना ‘रास्ते का पत्थर’ या चित्रपटापासून ओळखतो. कोणताही सीन ५० हून अधिक वेळा वाचण्याची त्यांची सवय आजही तशीच आहे. प्रत्येक सीनच्या शूटिंगपूर्वी ते कमीतकमी १० वेळा सराव करतात. तो सराव करताना इतर कलाकारांनीदेखील तसा सराव करावा अशी ती अपेक्षा ठेवत नाहीत. ते एकटे सराव करतात. आजही ते जो पहिल्यांदा जो सीन करतात, तो उत्तम असतो.”
दीपक सावंत या मुलाखतीत असेही म्हणाले की अमिताभ बच्चन यांच्यासारखा दुसरा कोणताच कलाकार नाही. ते म्हणाले, “अमिताभ बच्चन जितके शिस्तप्रिय आहे. ते काम करताना जितकी सहजता दाखवतात, तितका कोणताच कलाकार शिस्तबद्ध असल्याचे मी गेल्या ५० वर्षांत पाहिले नाही. अक्षय कुमारदेखील शिस्तबद्ध आहे, त्याच्या कामातदेखील सहजता असते. पण, तो ठरलेल्या वेळेतच काम करतो. तो ठरलेल्या वेळी येतो आणि ठरलेल्या वेळी जातो. अमिताभ बच्चन सलग १६ तास काम करतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी घरी परततात.”
दरम्यान, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हे नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असतात. कधी त्यांच्या एखाद्या चित्रपटातील पात्राची चर्चा होते, कधी त्यांचा एखादा लोकप्रिय संवाद चर्चेत येतो. अनेकदा बिग बी ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात त्यांच्या खासगी आयुष्यातील तसेच त्यांच्या व्यावसायिक आयुष्यातील अनेक किस्से सांगतात.
याबरोबरच अमिताभ बच्चन हे त्यांच्या ट्विट आणि ब्लॉगमधील त्यांच्या लिखाणामुळेदेखील चर्चेत असतात. ब्लॉगमध्ये ते त्यांचे अनुभव लिहितात. त्यांना एखाद्या विषयावर काय वाटते, त्यांचे मत काय आहे, याबद्दल ते वक्तव्य करताना दिसतात.